डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या पाच गुंतागुंतीच्या मोफत शस्त्रक्रिया

Spread the love


•स्पाईन फौंडेशनचे प्रमुख डॉ. भोजराज यांची माहिती
कोल्हापूर • प्रतिनिधी
     मुंबईतील स्पाईन फौंडेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा अस्थिरोग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रुरल स्पाईन आऊटरीच प्रोग्राम’चे आयोजन करण्यात आले आहे. याअतर्गत डी. वाय. पाटील हॉस्पीटल, कदमवाडी येथे गरीब रुग्णांसाठी मणक्याशी संबंधित आजारांवरील अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. शनिवारी पाच रुग्णांवर मणक्याच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या, अशी माहिती स्पाईन फौंडेशनचे प्रमुख डॉ. शेखर भोजराज यांनी दिली.
      डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. शेखर भोजराज यांनी स्पाईन फौडेशनचे कार्य, उद्देश व मणक्याच्या आजारावरील उपाययोजना याबबत माहिती दिली. यावेळी बोलताना डॉ. भोजराज यांनी, या उपक्रमाव्दारे आज डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये स्पाईन फाउंडेशनच्या तज्ञाद्वारे पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले. मणक्याला व्यंग्य असलेल्या १३ वर्षाच्या बालिकेवर अत्यंत गुंतातागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया न्यूरोमोनिटरवर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
     मणक्याच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून मजूर, औद्योगिक कामगार, शेतकरी, कष्टकरी अशा अत्यंत गरीब लोकांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, आर्थिक चणचणीमुळे त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत हे लक्षात आले. त्यामुळे केइएम रुग्णालयात १८ वर्षे सेवा केल्यानन्तर १९९८ मध्ये स्पाईन फाउंडेशनची स्थापना केली. ही एक व्हर्च्यूअल संकल्पना असून विविध भागातील स्पाईन सर्जन गरीब रुग्णांसाठी  ही सेवा देतात अशी माहिती डॉ. भोजराज यांनी दिली. राज्यात स्पाईन फाउंडेशनची ११ केंद्रे असून विविध सरकारी रुग्णालयांच्या माध्यमातून ही सेवा दिली जाते. कोल्हापुरात प्रथमच डी. वाय. पाटील हॉस्पिटल या खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून ही सेवा सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
     डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी प्रारंभी या योजनेची थोडक्यात माहिती देताना गरीब रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. प्रिवेन्शन, प्रमोशन, क्युरेशन व रिहॅबिलेशन या चार प्रमुख आयामावर विद्यापीठाचा भर असून येथे तयार होणाऱ्या डॉक्टर्सना त्यादृष्टीने तयार केले जात असल्याचे सांगितले.
     प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा यांनी गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास व त्याचा दर्जा उच्च राखण्यावर आमचा नेहमीच भर असल्याचे सांगितले. अधिष्ठाता डॉ. राकेशकुमार शर्मा यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून कॅशलेस उपचार सुविधा सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध अत्याधुनिक सोयी सुविधांची माहिती दिली.
याबाबत अधिक माहिती देताना अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. सलीम लाड व अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितले, या  उपक्रमाची सुरवात १ फेब्रुवारी २०२० रोजी करण्यात आली. पहिल्याच दिवशी स्पाईन फौंडेशन तज्ञ डॉक्टरांकडून १०० हून अधिक मणका विकारग्रस्त रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील दोन रुग्णांवर अवघड व गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या. मात्र त्यानंतर दुर्दैवाने कोरोना महामारीमुळे या उपक्रमाला खीळ बसली. परंतु त्यातून मार्ग काढत १८ फेब्रुवारी २०२१ रोजी रुग्णांकरीता ऑनलाईन ओपीडी चालू करण्यात आली,  २७ मार्च २०२१ रोजी यातील २ गरजू रुग्णांवरती तज्ञांदारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
     सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दर शुक्रवारी अस्थिरोग विभागात मणक्यांच्या रुग्णांची सकाळी ९ ते १ या वेळेत प्राथमिक तपासणी केली जाते. दुपारी ४ ते ६ या वेळेत स्पाईन फौंडेशनच्या डॉक्टरांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  मार्गदर्शन केले जाते. यातील गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. आजपर्यंत ऑनलाईन ओपीडीच्या माध्यमातून १८५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
     या उपक्रमाद्वारे भविष्यात मणक्याच्या दुर्मिळ व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कोल्हापूरात होणार आहेत. हा उपक्रम म्हणजे कोल्हापूरातील आर्थिक दुर्बल (पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांसाठी) व मणक्याच्या विकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदानच ठरणार आहे.
     यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उप कुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. सलीम लाड, अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.
——————————————————- Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!