छत्रपती राजाराम महाराजांना आदरांजली म्हणून पाच व्यापार्‍यांचे पुनर्वसन करणार

• राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचा उपक्रम
कोल्हापूर • प्रतिनिधी
     छत्रपती राजाराम महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांना आदरांजली म्हणून कोल्हापूर शहरातील सर्वस्व वाहून गेलेल्यापैकी पांच छोट्या व्यापार्‍यांचे संपूर्ण पुनर्वसन राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे केले जाईल, अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.
     राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे १९९६ पासून छत्रपती राजाराम महाराजांची जयंती साजरी केली जाते. तसेच समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंतांना ‘छत्रपती राजाराम गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे पुरस्कार कार्यक्रम आयोजित करता आला नाही. या रकमेतून तसेच पूरग्रस्त मदत निधीतून कोल्हापूर शहरातील सर्वस्व वाहून गेलेल्यापैकी अत्यंत छोट्या पाच व्यापार्‍यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय संस्थेच्या संचालक मंडळाने घेतला. यामध्ये स्टेशनरी, पंक्चर, सलून, मॅकॅनिक असे पाच छोटे व्यावसायिक निवडून त्यांना संपूर्ण साहित्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
     कोल्हापूरातील विमानतळास ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी  राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे सतत १५ वर्षे पाठपुरावा करून राज्य व केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात यशही मिळवले. निर्णयाची लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ललित गांधी यांनी सांगितले.
यावेळी असोसिएशनच्या कार्यालयातील छत्रपती राजाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *