जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांचे येत्या तीन वर्षात पुनर्वसन करणार: पालकमंत्री

Spread the love

 

• पुरबाधित गावांना भेटी देऊन नुकसानीची केली पाहणी
कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
     यंदाच्या पूर परिस्थितीचा फटका जिल्ह्यातील अनेक गावांना व शहरातील काही भागाला बसला. यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भविष्यात पुरामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी पूरबाधित सर्व नागरिकांचे येत्या तीन वर्षात शासकीय जमिनीवर पुनर्वसन करण्यात येईल, यावर्षी ३० टक्के, पुढील वर्षी ३० टक्के व त्यापुढील वर्षी उर्वरित सर्व नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
      भुदरगड तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन यासंदर्भात गारगोटी प्रशासकीय इमारतीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीस आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार के.पी.पाटील,  पंचायत समिती सभापती आक्काताई नलवडे, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, तहसीलदार अश्विनी अडसूळ, गट विकास अधिकारी सरिता पवार, पदाधिकारी, अधिकारी, पूरबाधित नागरिक उपस्थित होते.
     पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, पूरपरिस्थितीमध्ये प्रशासनाने बाधित नागरिकांचे जलदगतीने स्थलांतर केल्यामुळे जीवितहानी टाळता आली. भुदरगड तालुका कोरोनामुक्त होण्यासाठीही प्रशासनाने चांगले काम केल्याचे सांगून ते म्हणाले, अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे आणि भूस्खलनामुळे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. ओढ्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्याचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याबरोबरच कोणावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्या. घरे, शेतीपिकांबरोबरच विहिरीच्या नुकसानीच्याही नोंदी घ्याव्यात. बाधित लाभार्थ्यांचे पुनर्वसन करताना त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने यादी करा.
      पूरबाधित गावातील नागरिकांचे गतीने पूनर्वसन करण्यावर भर देणार असून यासाठी नागरिकांचेही सहकार्य गरजेचे आहे. पूर बाधितांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाचे प्राधान्य आहे, असे सांगून भूस्खलनाचा धोका असणाऱ्या नागरिकांची गायरान जमिनीवर तात्काळ  तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
     आ. प्रकाश आबीटकर म्हणाले, भुदरगड परिसरात दरवर्षी होणाऱ्या प्रचंड पावसामुळे दरडी कोसळणे, रस्ते खचणे, घरांची पडझड होत आहे. नद्यांप्रमाणे ओढ्याची पुररेषा निश्चित करणे आवश्यक आहे. डोंगराळ भागात राहणाऱ्या इथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार कायमस्वरुपी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
     भुदरगड, आजरा तालुक्यातील बहुतांशी गावे डोंगराळ भागात आहेत. अतिवृष्टी, पुराबरोबरच भूस्खलनाचा धोका या भागात अधिक आहे. यादृष्टीने उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे  उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांनी सांगितले.
     यावर्षीच्या पूरपरिस्थितीमध्ये भुदरगड तालुक्यातील २६ गावे बाधित झाली होती.  येथील ४०८ कुटूंबाचे स्थलांतर करण्यात आले होते, यातील १ हजार ७०२ नागरिकांचे तर लहान मोठ्या ७७२ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. बाधित ४०८ कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आले. पुरग्रस्तांची आरोग्य तपासणी करुन आवश्यक औषधपूरवठा करण्यात आला. कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने पुरग्रस्त नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या करुन घेण्याबरोबरच प्राधान्याने लसीकरण करण्यात आले आहे. तालुक्यात कुर, कोणवडे, शेणगाव या गावांना पुराचा अधिक फटका बसला असून तालुक्यातील पुरामुळे झालेल्या घर पडझडीचे व सानुग्रह अनुदानाबाबतचे पंचनामे पूर्ण झाले असून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरु असल्याची माहिती तहसीलदार अश्विनी अडसूळ-वरुटे यांनी यावेळी दिली.
——————————————————-
 Attachments area

ReplyForward

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!