गार्डन्स क्लबच्यावतीने पुष्पप्रदर्शनाचे आयोजन

Spread the love

• २४ व २५ डिसेंबरला ५१ वे पुष्पप्रदर्शन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ व्या पुष्पप्रदर्शन २४ आणि २५ डिसेंबरला कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
      स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना कल्पना सावंत म्हणाल्या की, प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा, वर्कशॉप्स, डिस्प्ले, विक्री स्टॉल यांची रेलचेल असणार आहे. दि. २४ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत विविध प्रकारच्या फुलांच्या साधारण २० विभागातील ५५ स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे मूल्यांकन होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर पुष्प प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून शांतादेवी डी. पाटील व अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे कृषी सहयोगी संचालक डॉ. उत्तम होले उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पुष्प प्रदर्शन सर्वांसाठी खुले होईल. यावेळी ‘रोजेट’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन समारंभ व उद्यान स्पर्धांचा बक्षीस समारंभ होईल.
      लँडस्केप स्पर्धेतील रचनाही सर्वांना पाहता येतील. दि.२४ रोजी दुपारी शॉर्टफिल्म स्पर्धेच्या निवड झालेल्या फिल्मचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. त्याचवेळी युट्युबवर देखील हे स्क्रीनिंग पाहता येणार आहे. तर संध्याकाळी फ्लॉवर शोचे मुख्य आकर्षण असलेला फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांचा ‘बोटॅनिक फॅशन शो’ आणि ‘मॅनी क्वीन डिस्प्ले स्पर्धा’ असणार आहेत. ही स्पर्धा सर्वांना पाहण्यासाठी खुली आहे.
      उद्यानाविषयी निगडित अनेक वस्तूंचे स्टॉल तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील अतिशय कलात्मक मातीच्या वस्तू, टेराकोटा ज्वेलरी, हायड्रोफोनिक्स, सेंद्रिय खते, बागेसाठी उपयुक्त अशा अनेक विविध वस्तूंचे व खाद्यपदार्थांचे तसेच नर्सरीचे स्टॉल येथे पाहण्यासाठी व विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दि.२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत अबालवृद्धांसाठी कॅम्लीन प्रायोजित चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. यावर्षीच्या सर्व स्पर्धा संयुक्त संघटनेच्या ‘इकोसिस्टीम रिस्टोरेशन’ या संकल्पनेवर आधारित असणार आहेत. त्यानंतर १०:३० ते १२:३० या वेळेत प्रसिद्ध मास्टरशेफ पद्मा पाटील यांचे ‘फ्रुट कार्विंग’चे वर्कशॉप होणार आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत टेक्स्टाईल डिझायनर तेजल देशपांडे यांचे नॅचरल डायवर वर्कशॉप होणार आहे. दि.२५ रोजी सायंकाळी ५ ते ७:३० या वेळेत पुष्प प्रदर्शनाचा बक्षीस समारंभ सोहळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्या हस्ते होणार आहे.
     पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, सदस्य वर्षा कारखानीस, शैला निकम, वर्षा वायचळ, सुभाषचंद्र अथणे, अशोक डुणूंग, संगीता कोकितकर, दीपा भिंगार्डे आदि उपस्थित होते.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!