• १४ ते १७ एप्रिल दरम्यान गायमुखावर अन्नछत्र उपक्रम
कोल्हापूर • प्रतिनिधी
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची यात्रा १६ एप्रिलला होत आहे. यासाठी लाखो भाविक येतात. जोतिबा डोंगरावर येणाऱ्या यात्रेकरूंसाठी सहजसेवा ट्रस्टच्यावतीने दरवर्षीप्रमाणे अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे. १४ ते १७ एप्रिल दरम्यान गायमुखावर अन्नछत्र उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती चिंतन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मनिष पटेल, संकेत पाटील, चेतन परमार, रोहित गायकवाड यांच्यासह ‘सहजसेवा’चे ट्रस्टी सन्मती मिरजे, प्रकाश केसरकर, प्रमोद पाटील आदींसह युवराज (बंडा) साळोखे, सुनील कुंभार उपस्थित होते.
सहजसेवा ट्रस्टच्यावतीने २००१ला पहिले अन्नछत्र सुरू करण्यात आले. त्यानंतर गेली १९ वर्षे जोतिबा भाविकांच्या सोयीसाठी दरवर्षी यात्राकाळात अन्नछत्र उपक्रम राबविण्यात येतो. कोरोनाकाळात जोतिबा यात्रा झाली नाही, हा दोन वर्षांचा कालावधी वगळता यात्रेकरूंसाठी अन्नछत्र उपक्रम राबविण्यात येतो. आता कोरोना संकट टळले असल्याने यंदा लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबा यात्रा उत्साहात होईल.
यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांना चार दिवस अहोरात्र अन्नछत्र उपक्रम सुरू राहणार आहे. सहजसेवाचे ट्रस्टी सन्मती मिरजे, प्रकाश केसरकर, प्रमोद पाटील आदींसह अन्य सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या अन्नछत्र उपक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक भाविकांनी या उपक्रमाला नेहमीप्रमाणे मदतीचा हात दिला आहे. तरीही या उपक्रमास ज्यांना मदत करावयाची ईच्छा असेल त्यांनी सहजसेवा ट्रस्ट, ३९८, ई वॉर्ड, आशिष चेंबर, स्टेट बँक कोषागारजवळ, शाहूपुरी, कोल्हापूर किंवा मोबाईल नंबर ९८९०९४४३४३ येथे संपर्क साधावा.