कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापुरातील १२ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी विशेष गोलकिपर ट्रेनिंग कॅम्पला सोमवारी (दि.७) छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरू झाला आहे. हा विशेष गोलकिपर ट्रेनिंग कॅम्प कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए)चे अध्यक्ष व विफाचे उपाध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्य व विफाच्या महिला फुटबॉल समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूरात प्रथमच होत आहे.
दरम्यान, छत्रपती शाहू स्टेडियमवर गोलकिपर ट्रेनिंग कॅम्पचे उदघाटन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, जॉ.जनरल सेक्रेटरी राजेंद्र दळवी, मारिओ एग्युअर व सुखदेव पाटील तसेच कॅम्पचे को-ऑर्डिनेटर पृथ्वी गायकवाड व योगेश हिरेमठ उपस्थित होते.
भारतामध्ये प्रथमच अशाप्रकारे १२ ते १८ वयोगटातील मुले व मुली यांच्यासाठी कॅम्प होत आहे. या कॅम्पची छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरूवात झाली असून १२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या कॅम्पमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २८ खेळाडूंनी सहभाग घेतला असून यामध्ये १७ मुले व ११ मुली आहेत. या कॅम्पसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय संघ गोलकीपर प्रशिक्षक मारिओ एग्युअर तर सहा. प्रशिक्षक म्हणून भारतीय ज्युनियर संघ गोलरक्षक सुखदेव पाटील कामकाज पाहणार असून ते बेसिक कॅचिंग डायव्हिंग, क्रॉसिंग, पंचिंग, डिस्ट्रिब्युशन विथ हॅंड ॲण्ड लेग्ज, ड्रिल्स, शॉट स्टुपिंग डिलींग विथ क्रॉसेस, सायकॉलॉजिकल अस्पेक्ट इत्यादीचे व्हिडिओज्, थेअरी व मैदानावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यांचे प्रशिक्षण देणार आहेत. यामुळे गोलकीपर खेळाडूंना आधुनिक पद्धतीने तंत्रशुद्ध विकास होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार आहे. या कॅम्पसाठी डेंपो फुटबॉल संघाच्या टेक्निकल प्रमुख अंजना तुरंबेकर यांचे सहकार्य लाभले आहे.