फुटबॉलपटू अनिकेत जाधव हैदराबाद एफसीकडून करारबद्ध ; २कोटी २५लाखाचा करार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     आयएसएल अर्थात इंडियन सुपर लीग संघ असलेल्या हैदराबाद एफसी संघाने कोल्हापूरचा युवा फुटबॉल खेळाडू अनिकेत अनिल जाधव याला करारबद्ध केले आहे. बुधवारी (दि.२१) अनिकेतने मानोलो मार्केझच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या हैदराबाद एफसी संघासोबत तीन वर्षांचा करार केला आहे. बुधवारी झालेल्या करारानुसार अनिकेतला तीन वर्षांसाठी २ कोटी २५ लाख रूपयांचे पॅकेज मिळेल.
     या करारावर सही केल्यानंतर अनिकेत जाधव म्हणाला की, ‘मी हैदराबाद क्लबच्या खेळाडू आणि कोचिंग स्टाफसोबत काम करण्यास उत्सुक आहे. आयएसएलमधील अनेक चांगले तरुण खेळाडू हैदराबाद एफसीकडून खेळत आहेत. आता पुढील तीन वर्षे हैदराबाद एफसीसाठी मी चांगली कामगिरी करेन. मी खूप आनंदी आहे आणि आता मी हैदराबाद एफसीकडून खेळण्याची आणखी वाट पाहू शकत नाही.’
      कोल्हापुरातील शाहूपुरी येथे राहणाऱ्या २१ वर्षीय अनिकेत जाधवने आपल्या फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात पुणे एफसी ॲकॅडमीसोबत केली. तो क्लबमध्ये तीन वर्षे होता आणि तिथे तो विविध वयोगटातील सामने खेळला. २०१५ मध्ये त्याची निवड ट्रायलनंतर १७ वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाच्या शिबिरासाठी झाली. राष्ट्रीय युथ संघासोबत चमक दाखवल्याने त्याला भारतात झालेल्या एएफसी १६ वर्षाखालील आणि १७ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास मिळाले. अनिकेत दोन हंगामाकरता (२०१७-१९) इंडियन ॲरोज संघात होता. ज्यामध्ये त्याने आय लीगमध्ये १८ सामन्यात दोन गोल केले. त्यानंतर आयएसएल हंगामात त्याने जमशेदपूर एफसीकडून पदार्पण केले. ज्यामध्ये त्याने दोन हंगामात २७ सामन्यात सहभाग नोंदवला. २०१९मध्ये  अनिकेतला ब्लॅकबर्न रोवर्सकडून त्यांच्या ॲकॅडमीमध्ये तीन महिने सराव करण्याची संधी मिळाली.
     दरम्यान, वेगवान आणि आक्रमक चढाई करतानाच प्रतिस्पर्धी संघाची बचावफळी भेदण्यात चपळ असलेल्या अनिकेत जाधवने भारतात झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दमदार खेळ केला होता. अनिकेतने २०१७ साली झालेल्या १७ वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली होती.
                           ………..
           अनिकेत आमच्या संघात चांगली भर घालेल: मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ
     हैदराबाद एफसी संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ म्हणाले की, तरुण खेळाडूंनी, विशेषत: अटॅकर्सनी नियमित खेळण्याची गरज आहे. परंतु संपूर्ण हंगामात उच्च पातळी राखणे त्यांच्यासाठी सोपे नाही. येथूनच संघात स्पर्धा महत्त्वाची असते आणि अनिकेत यामध्ये अगदी फिट बसतो. तो वेगवान आहे आणि कोणत्याही आक्रमक फळीत तो खेळू शकतो. आमच्या शैलीसाठी विंगर्स महत्त्वपूर्ण आहेत आणि मला खात्री आहे की अनिकेत आमच्या संघात चांगली भर घालेल.
                    ‌      ……….
             अनिकेतसह पाच नवीन खेळाडू…..
     हैदराबाद एफसी संघाकडून तीन वर्षांसाठी अनिकेत जाधव करारबद्ध झाला आहे. यंदाच्या हंगामात हैदराबाद एफसी संघात रबीह आणि एरन शिवाय बार्थोलोम्यू ओगबेचे आणि एडु गार्सिया या खेळाडूंसह तो पाचवा नवीन खेळाडू आहे. अनिकेत अब्दुल रबीह आणि एरन डिसिल्वा या नवीन खेळाडूंसोबत मनोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिसेल.
——————————————————-

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!