कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी महानगरपालिकेला २३ लाखाचा निधी

• आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून निधी
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर महानगरपालिकेस कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी २३ लाख रूपयांचा निधी दिला. भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत, निधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सूपूर्द केले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदी उपस्थित होते.
      राज्य शासनाने खास बाब म्हणून आमदार निधी अर्थात स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी एक कोटी रूपये खर्च करण्यास सहमती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयासाठी (सीपीआर) वैद्यकिय यंत्रसामग्री व साहित्यासाठी ४० लाख ५० हजार रुपयांचा निधी दिला आहे, तर कोल्हापूर महापनगरपालिकेस ३६ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
      कोरोनाच्या काळात कार्डियाक रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गंभीर रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. त्यातही यातील गंभीर रुग्णांना फुफ्फुस तसेच हृदयाशी संबंधित आजार असतात. त्यामुळे व्हेंटिलेटर व ऑक्सिजन आदी अद्ययावत सुविधा असलेली ‘कार्डियाक’ रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक असते.
      मात्र, कोल्हापूर महानगरपालिकेकडे अशी एकही रुग्णवाहिका नाही. त्यामुळे अशा रूग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे औषधे, ईसीजी, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, सीरिज पंप यांसारख्या सुविधाने परिपूर्ण असलेली कार्डियाक रुग्णवाहिका कोल्हापूर महानगरपालिकेकडे असावी, असा मानस आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला. यानुसार आमदार जाधव यांनी कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी महानगरपालिकेला २३ लाख रूपयांचा निधी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *