कोल्हापूर • प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत पोलिस कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, महापालिका कर्मचारी ठिकठिकाणी आपले कर्तव्य बजावित आहेत. या कोविड योद्ध्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस अशोक देसाई यांच्यातर्फे आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात येत आहे.
अशोक देसाई कालपासून या कोविड योद्ध्यांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे सूप आणि काढा वितरीत करत आहेत. कोविड योद्ध्यांना ते ज्याठिकाणी आपले कर्तव्य बजावित आहेत त्याठिकाणी सूप आणि काढा दिला जातो.
एक आठवडाभर दररोज गरमागरम सूप वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ऊन, वारा आणि पावसात कर्तव्य बजावित असलेल्या या कोविड योद्धयांसाठी सामाजिक जाणिवेतून हा आरोग्यदायी उपक्रम राबवित असल्याचे अशोक देसाई यांनी सांगितले.
अशोक देसाई हे पतंजली योग समितीचे योगशिक्षक असून पंचकर्म चिकित्सा व मसाज प्रविण आहेत. ते विविध प्रकारचे सूप व काढा तयार करतात. गेली २३ वर्षे रंकाळा तलाव चौपाटी येथे ‘मॉर्निंग वॉक’ला येणाऱ्या अनेक व्यक्तींनी त्यांनी बनविलेला काढा आणि सूप घेतले आहे. मुळात हे दोन्ही पेय शक्तीवर्धक असून त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे घटक असतात.
कडूनिंब, कारले, तुळस, आवळा, गव्हांकूर, कोरफड, दुधीभोपळा, शतावरी, सफेद मुसळी, कुळीथ माडगे, शेवगा, जीरा सूप असे विविध प्रकारचे ४८ सूप बनवले जातात, असे अशोक देसाई यांनी सांगितले.
———————————————–