कोल्हापूर ते कळे राष्ट्रीय महामार्गाकरीता १७१ कोटी रु. मंजूर

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     तळकोकणला जावयाचे झाल्यास कोल्हापूर ते गगनबावडा या मार्गाकडे पाहिले जाते. परंतु हा रस्ता वाहतुकीच्यादृष्टीने खराब झाला असून कोल्हापूर ते तळेरे (सिंधुदूर्ग जिल्हा) दरम्यान रस्त्याची सुधारणा करावी, याकरीता खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री  नितीन गडकरी यांची दिल्ली येथे यापुर्वी समक्ष भेट घेवून मागणी केली होती. 
       दरम्यान, खासदार मंडलिक यांनी कोल्हापूर ते तळेरे दरम्यान मागणी केलेल्या रस्त्यापैकी कोल्हापूर ते कळे दरम्यान १६.४४ किमी इतक्या लांबीच्या रस्त्याकरीता १७१ कोटी रु. मंजूर करत असल्याचे आज नाम. नितीन गडकरी यांनी पत्राव्दारे खासदार मंडलिक यांना कळविले आहे. 
       याबाबत अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापूर ते तळेरे हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र व तळकोकण यांच्यातील मोठा दूवा असून या रस्त्यावर पर्यटन, उद्योग आदी कारणांमुळे वाहतुक मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  त्यामुळे या रस्त्याला महामार्गाचा दर्जा देवून या रस्त्याच्या मजबुतीकरण व दुपदरीकरणाकरीता आवश्यक असणारा निधी केंद्र सरकारने उपलब्ध करुन द्यावा म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेवून मागणी केली असता या रस्त्याला महामार्गाचा दर्जा देवून पहिल्या टप्यामध्ये कोल्हापूर ते कळे दरम्यान १६.४४ किमी लांबीच्या तर दहा मीटर इतक्या रुंदीच्या काँक्रीट रस्त्याकरीता १७१ कोटी रु. मंजूर केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. 
      पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचून हा रस्ता
वाहतुकीकरीता बंद होत असल्याकारणाने ज्या ठिकाणी पाणी साचून राहते त्याठिकाणी पाण्याचा निचरा व्हावा याकरीता मोरी अथवा लहान पूल बांधण्यात येणार असून बालिंगा येथे भोगावती नदीवरील ब्रिटीशकालीन पुलाला समांतर असा नविन पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी जमिन लवकरच संपादीत केली जाणार आहे.  या कामाची निविदा प्रक्रिया राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम सुरु होणार असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली. 
———————————————– Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!