सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची जीवाची बाजी!


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महावितरण कर्मचारी आणि आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी युद्धपातळीवर काम पूर्ण करणे, अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होत असते. त्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर आणखी एका कामगिरीची भर पडली आहे.
       कोल्हापूर शहरातील जरगनगर भागात वादळी वाऱ्यामुळे रात्री पावणे आठच्या सुमारास ११ के. व्ही. संभाजीनगर उच्चदाब वाहिनीवर निलगिरीचे झाड कोसळून पडल्याने त्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. याच भागात श्री हॉस्पिटल येथे कोविड रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. ही बाब महावितरण कर्मचारी रोहित तोडकर व उमेश आंबी यांच्या लक्षात आली. साधारणपणे ३५ ते ४० फूट उंची असणाऱ्या निलगिरीच्या झाडाची २५ फुट लांबीची फांदी वाहिनीवरती पडल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता.
      निलगिरीचे झाड गुळगुळीत असल्याने त्यावर चढणं कठीणचं  होतं. मात्र वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी हे काम लवकर पूर्ण करणे आवश्यक असल्याने इतर साधनांची वाट पाहण्यात वेळ दवडणे रोहित तोडकर यांना पटत नव्हते, ते लगेच कामाला लागले. रात्रीच्यावेळी जीवाची बाजी लावून वीजवाहिनीवर पडलेल्या निलगिरीच्या झाडांच्या फांद्या छाटून ते वीजवाहिनीपासून दूर केले. उमेश आंबी यांनी लघुदाब वीजवाहिनीच्या तुटलेल्या वीजतारा जोडून घेतल्या. अवघ्या दीड दोन तासात त्या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची कामगिरी रोहित व उमेश यांनी पार पाडली. याकामी सहायक अभियंता अश्विनकुमार वागळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *