कोल्हापूरात प्रथमच ‘ओम महामंत्र का उच्चारण’ कार्यक्रम

Spread the love

कोल्हापूरात प्रथमच ‘ओम महामंत्र का उच्चारण’ कार्यक्रम

• ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थानाच्या वतीने आयोजन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     छत्तीसगडमधील रायपूर येथील ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थानाच्यावतीने कोल्हापुरात प्रथमच “ओम महामंत्र का उच्चारण” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.२३) राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत आणि बुधवारी (दि.२४) सेंट्रल पंचायत हॉल, गांधीनगर, कोल्हापूर येथे संध्याकाळी ४.३० ते ७ या वेळेत विनामूल्य हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका अंजना पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी नरेश चोइथानी, विठ्ठल चोपदार, तुमेश्वर साहू, हरीश कंजनी, जय सुंदरानी आदी उपस्थित होते.
      अंजना पवार म्हणाल्या की, समाजात एकमेकांबद्दल असणारा जिव्हाळा, आपलेपणा कमी होत आहे. तरुणवर्गात वाढणारी बेरोजगारी यामुळे त्यांच्यात निराशा पसरत आहे. सतत माणूस मानसिक तणावाखाली असतो. याचा परिणाम त्याच्या शरीरावर होत आहे. अनेक आजार उद्भवतात. आज तरुणांमध्ये ब्लडप्रेशर, हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत चालले आहे. यासाठी ‘ओम’चे उच्चारण हा या सर्व गोष्टींवर प्रभावी उपचार ठरत आहे. रोज सकाळी थोडावेळ ‘ओम’चे उच्चारण केल्याने मानसिक शक्तींचा विकास होतो. दिवसभर मन प्रसन्न राहते.  मुलांवर तसेच घरातील वयोवृद्ध यांच्यावरही याचा चांगला परिणाम दिसत आहे. ओम उच्चारण्याने घरातील वातावरण शांत व आनंदी राहते. ओम उच्चारण तर सगळेच करतात पण विधिपूर्वक केलेल्या ओम उच्चारणाने आपल्या मानसिक शक्तीचा विकास होतो आणि आपल्या प्रत्येक कार्यात सकारात्मक बदल होतो.
      त्या म्हणाल्या की, संस्थानच्या मुख्य संचालिका देवकी मैया यांनी ईश्वराच्या प्रेरणेने ही ओम उच्चारण्याची चळवळ सुरु केली. याचे अनेक फायदे होत आहेत. ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थानाच्यावतीने संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी याचा प्रचार प्रसार करण्यात येत आहे. लहान मुलांवर आत्तापासूनच ओम उच्चारणाचे संस्कार झाले तर पुढे हीच पिढी सकारात्मक व संस्कारक्षम बनेल. यासाठी विविध शाळांमध्ये ओम ध्वनी उच्चारणाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. कोल्हापुरात अशा प्रकारे हा कार्यक्रम प्रथमच होत आहे. तरी यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही संस्थेच्या संचालिका अंजना पवार यांनी  केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!