विद्यापीठाच्या दुबार गुणपत्रिकेसाठी ऑनलाईन संगणकप्रणालीचे लोकार्पण


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत दुबार गुणपत्रिकांची आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन संगणक प्रणालीचे सोमवारी (दि. ५ जुलै) कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते आणि व्यवस्थापन परिषदेचे कुलपतीनियुक्त सदस्य अमित कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या संगणक केंद्राच्या प्रभारी संचालक स्वाती खराडे यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.
     कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते studentapps.unishivaji.ac.in/suksfc/ या लिंकवर क्लिक करून सदर सेवेचे लोकार्पण करण्यात आले. उपरोक्त लिंकसह online.unishivaji.ac.in या पेजवर students online applications या टॅबवरही सदर सेवा उपलब्ध असणार आहे.
     या सेवेमुळे विद्यार्थ्यांचा येण्याजाण्याचा खर्च, वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर त्यांना सध्याच्या कोविड-१९ साथीच्या कालखंडात जागेवर गुणपत्रिका उपलब्ध होऊ शकणार आहे, ही समाधानाची बाब आहे. यापुढील काळात विद्यार्थीभिमुख अन्य सेवांचेही टप्प्याटप्प्याने संगणकीकरण करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या प्रसंगी केले.
     विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत दुबार गुणपत्रिका घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया करावी लागत असे. यात विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत असे. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने ऑनलाईन संगणक प्रणाली स्वनिर्मित केली आहे. या प्रणालीद्वारे अर्जदारास ऑनलाईन अर्ज सादर करणे, पेमेंट गेटवेद्वारे शुल्क भरणे या बाबी ऑनलाईन स्वरुपात करता येणार आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदार विद्यार्थ्यास दुबार गुणपत्रिकेची सॉफ्ट कॉपी नोंदणीकृत ई-मेलवर तातडीने पाठविण्यात येईल, त्याचप्रमाणे त्याची मूळ दुबार गुणपत्रिका अर्जदाराकडून विहीत शुल्क आकारून त्याने नमूद केलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे अगर हस्ते देण्यात येईल.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *