कोल्हापूर • प्रतिनिधी
पूरबाधित क्षेत्रातील नागरिक व व्यापारी यांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. बलकवडे यांना निवेदन दिले.
सन २०१९ पासून कोल्हापूर सातत्याने नैसर्गिक आपत्तींच्या फेऱ्यात अडकले आहे. २०१९ आलेला महापूर आणि त्यानंतर २०२० व २०२१ मध्ये कोरोना संक्रमण काळात झालेले लॉकडाऊन यामुळे कोल्हापुरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच पुन्हा एकदा महापुराने थैमान घातल्यामुळे सामान्य माणसाचे जगणे कष्टप्रद झाले आहे. जुलै २०१९ पासून कोल्हापुरातील बहुतेक व्यवसाय अत्यंत कमी कालावधीसाठी सुरू राहिले. त्यामुळे नोकरदार व छोट्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. छोट्या-मोठ्या सर्वच व्यावसायिकांच्या व्यवसायावर दोन महापूर आणि कोरोनाच्या एकामागोमाग एक आलेल्या लाटा यामुळे गंभीर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर नुकत्याच आलेल्या महापुराच्या संकटामुळे पूरबाधित क्षेत्रातील नागरिक व व्यवसायिकांना अधिकच आर्थिक नुकसान सोसावे लागत आहेत. अशा नागरिकांना प्रशासनाच्यावतीने दिलासा मिळावा, या उद्देशाने आज भाजपा शिष्टमंडळाने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना पूरबाधित क्षेत्रातील नागरिक, व्यापारी यांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावा यासाठीचे निवेदन दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, हेमंत आराध्ये यांनी विविध मुद्दे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे मांडले.
याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, विजयसिंह खाडे-पाटील, सागर आथणे आदी उपस्थित होते.