कागल तालुक्यात रविवारपासून दहा दिवस कडक जनता कर्फ्यू

Spread the love

• मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रशासनाला सूचना
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कागल तालुक्यात रविवार (दि.९) पासून बुधवार (दि.१९)पर्यंत दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करा, अशा सक्त सूचना ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या.
      ज्या तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहेत, त्या तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जनता कर्फ्यू अत्यंत कडक करा, कुणालाही बाहेर पडू देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. कागलमध्ये कोरोनाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
     मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या दहा दिवसांच्या काळात दूध व औषध दुकाने या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील तसेच पेट्रोल पंप फक्त अत्यावश्यक सेवांना पेट्रोल देण्यासाठी सकाळीच सुरू राहतील. तालुक्यातील कसबा सांगाव, मौजे सांगाव, व्हन्नूर व वंदूर या गावांमध्ये बाधितांची संख्या जास्त आहे. या गावांना रेड अलर्ट एरिया जाहीर करून अँटीजन व आरटीपीसीआर टेस्टसह लसीकरणही वाढवा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
      ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा गंभीर धोका घराघरांपर्यंत पोहोचला आहे, याचे आतातरी भान ठेवा. ग्राम समित्या व प्रभाग समित्यांनी दक्ष रहा. दवाखान्यांमध्ये बेडसह औषधांचीही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे घरात राहून संसर्गाची साखळी तोडणे हेच आपल्या हातात आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा विषाणू अधिक गंभीर असल्याचे सांगतानाच श्री. मुश्रीफ म्हणाले, संसर्ग झाल्यापासून सहावा, सातवा व आठवा हे तीन दिवस फार धोक्याचे असतात. कोणतेही लक्षण दिसताच तात्काळ चाचणी करा. तसेच बाधितांच्या नातेवाईकांनीही तातडीने चाचण्या करा. त्यामुळे संसर्ग वाढणार नाही. 
    भारतातील कोरोना परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्यामुळे संपूर्ण जगभरातून साहित्य आणि औषधे येत आहेत. हा संदर्भ देत श्री. मुश्रीफ म्हणाले, जगातून येणारे साहित्य व औषधे रुग्णांच्या प्रमाणात त्या – त्या राज्यांना वाटले पाहिजे. तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी लवकरच कागलमध्ये ऑक्सीजन प्रकल्प व एच.आर.सी.टी. स्कॅन यंत्रणाही कार्यान्वित करणार असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
     आपल्याकडे कामानिमित्त येणाऱ्या जनतेने फोनवरून काम सांगावे, असेही ते म्हणाले.
      बैठकीला प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगुडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, डॉ. नवनाथ मगदूम, डॉ. अमर पाटील, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, सहाय्यक गटविकास अधिकारी आप्पासाहेब माळी, कागलचे नगर अभियंता सुनील माळी, मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी तारळकर आदी अधिकारी उपस्थित होते.
                  ……..
          खासगी डॉक्टरांनाही इशारा…..
     मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या लक्षणांचा पेशंट आल्यास खासगी डॉक्टरांनीही तात्काळ त्याला चाचणी करण्याचा सल्ला द्यावा. तसेच ही माहिती तात्काळ शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी. अन्यथा; खाजगी डॉक्टरांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!