कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कुल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट अधिविभागामार्फत बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा अभ्यासक्रम या वर्षापासून सुरु करण्यात आला आहे. एव्हिएशन सर्व्हिसेस अँड एअर कार्गो आणि ऍग्री स्टोरेज अँड सप्लाय चेन या दोन स्पेशलायझेशनमध्ये हा पदवी अभ्यासक्रम राबविला जाणार असल्याची माहिती स्कुल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट च्या अधिष्ठाता डॉ.योगेश्वरी गिरी यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या ”कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (MSDE) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) द्वारे स्थापन केलेल्या लॉजिस्टिक सेक्टर कौशल्य परिषदेसोबत (LSC) आम्ही हे दोन्ही अभ्यासक्रम सहयोगित केले आहेत. हे दोन्ही अभ्यासक्रम २ + १ आधारावर असून विद्यार्थ्यांना पाचव्या व सहाव्या सेमिस्टरमध्ये इंडस्ट्रीमध्ये जाऊन सशुल्क ॲप्रेंटिसशिप ही करता येणार आहे हा याचा फायदा आहे. ॲप्रेंटिसशिप-आधारित बीएमएस पदवी कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या पर्यवेक्षकीय / व्यवस्थापकीय स्तरावर विमान वाहतूक सेवा आणि हवाई मालवाहतूक उद्योग तसेच कृषी साठवण आणि पुरवठा साखळी उद्योगात पुरेसे कौशल्य निर्माण करण्याच्या अत्यंत केंद्रित उद्देशाने तयार केला गेला आहे.
प्रभावी कौशल्य विकास सुनिश्चित करण्यासाठी या कोर्समधील ६०% अभ्यासक्रम हा इंडस्ट्रियल ट्रेनिंग व अॅप्रेंटिसशिप वर आधारित बनविला गेला आहे. देशात विमानतळांची संख्या वाढत आहे आणि प्रत्येक नवीन विमानतळ मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी देते. तसेच कृषी क्षेत्रासारखे व्यापक क्षेत्र देखील रोजगाराच्या व उद्योजकतेच्या अनेक संधी उपलब्ध करून देणारे आहे हे आपण कोवीड महामारीमध्येही अनुभवले आहे. या कोर्सेसना भविष्यात करिअरच्या खूप संधी उपलब्ध असून कमी कालावधीत विद्यार्थ्यांना पटकन चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी मिळवून देणारा कोर्स आहे. तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
याबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एन.के पाटील, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी, अकॅडमिक डीन डॉ. एम. टी. तेलसंग यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या