कोल्हापूर • प्रतिनिधी
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या अटल रँकिंगमध्ये (अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इंनोव्हेशन अचिव्हमेंट (एआरआयआयए)) संजय घोडावत विद्यापीठाला खाजगी व अभिमत विद्यापीठ गटातून ”प्रॉमिसिंग बँड” म्हणून बहुमान प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल विद्यापीठाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून हे रँकिंग देण्यात आले आहे. या रँकिंगसाठी विविध निकष लावण्यात आले असून यामध्ये अर्थसंकल्प व निधी, इन्फ्रास्ट्रक्चर, सोयीसुविधा, नवकल्पना निर्मिती, रोजगार निर्मितीला चालना, नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रम, बौद्धिक निर्मिती, तंत्रज्ञान आणि व्यावसायिकीकरण, प्रशासनातील नाविन्यता इत्यादी निकष काटेकोरपणे तपासूनच हे रँकिंग देण्यात आले आहे, अशी माहिती विश्वस्त विनायक भोसले व कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी दिली.
भारत सरकारकडून ही क्रमवारी नुकतीच जाहीर केली असून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे रँकिंग प्रसिद्ध करण्यात आले आहे. या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यापीठाचा समावेश असून घोडावत विद्यापीठ त्यापैकीच एक आहे.
संजय घोडावत विद्यापीठामार्फत प्रामुख्याने लिबरल आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी,आर्किटेक्चर, फार्मसी, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विभागांतर्गत अभ्यासक्रम सुरु आहेत व यामध्ये विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर व पी.एच.डी पर्यंत पदवी धारण करण्याची संधी उपलब्ध आहे.
संशोधन व नाविन्यता यावर जोर देण्यासाठी जागतिक स्तरावरील शिक्षण पद्धती व संस्कृती जपण्याचे कार्य हे विद्यापीठ करीत आहे.विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्तम असणाऱ्या मातब्बरांना आणि तज्ञांना आकर्षित केले आहे आणि या उद्देशासाठी त्यांना जागतिक दर्जाची आधारभूत संरचना पुरविली आहे.
याबाबत बोलताना अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले ”या विद्यापीठाला जगातील टॉप २०० विद्यापीठामध्ये क्रमवारी प्राप्त व्हावी हे आमचे दिवास्वप्न आहे व याचीच प्रचिती अवघ्या ४ वर्षातच भारत सरकारच्या अटल रँकिंगमध्ये हे विद्यापीठ गणले गेले ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. या विद्यापीठात संशोधन आधारित अध्यापनावर भर दिला जातो. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, सृजनशीलता, कलागुणकौशल्य, तांत्रिक कौशल्ये व व्यावसायिक अभिवृत्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात त्यामुळे या यशाचे सर्व श्रेय विद्यापीठाच्या सर्व घटकाला जाते ” असे बोलून त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
——————————————————-