कोल्हापूर • प्रतिनिधी
इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, दिल्ली यांच्याकडून संजय घोडावत विद्यापीठाला ”युनिव्हर्सिटी फॉर सोशल काँट्रीब्युशन २०२०”हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आयएसटीईचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह देसाई व आदी मान्यवर उपस्थित होते.
महापूर, दुष्काळ व कोविड-१९ काळात त्यांनी केलेल्या प्रशंसनीय समाजकार्यामुळे विद्यापीठाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कोरोनाकाळात संजय घोडावत विद्यापीठ हे कोल्हापूर जिल्ह्याला वरदान म्हणून लाभले. संजय घोडावत फौंडेशनने कोरोनाकाळात पाच लाखाहून अधिक लोकांना फूड पॅकेट्स तसेच पीपीई किट्स, मास्क, सॅनिटायझर्स, जीवनावश्यक वस्तू आणि इतर मदत साहित्य पुरवले आहे. तसेच संजय घोडावत विद्यापीठ कॅम्पसमध्ये उभारलेल्या अत्याधुनिक कोविड केअर सेंटरमधून आजवर बाह्यरुग्ण ४०,००० व आंतररुग्ण २७,४०० बरे होऊन घरी सुखरूप परतले आहेत. याचबरोबर विद्यापीठ वसतिगृहाच्या सुसज्ज ४५० रूम्स या कोविड केअर सेंटरसाठी देण्यात आल्या होत्या. कोरोना काळात फौंडेशंकडून जीवनावश्यक वस्तूंचे देखील वाटप करण्यात आले.
संजय घोडावत विद्यापीठाच्यावतीने ”सौजन्याची वारी आली आपल्या दारी ”या सामाजिक उपक्रमामार्फत सौजन्य रथ सुरू करण्यात आला आहे. देणगीदारांकडून नवीन व जुने वापरण्यायोग्य कपडे, वस्तू, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, चप्पल, बुट, पर्स, खेळणी, इलेक्ट्रिकल साहित्य इ. संकलित करून ग्रामीण भागातील गरजू व्यक्तिपंर्यंत पोहचविन्यासाठी हा रथ सुरू करण्यात आला आहे.
विद्यापीठाने महिला सबलीकरण, शिक्षण, सॅनिटायझेशन आणि स्वच्छता, ग्रामीण विकास, क्रीडा, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन मदत कार्य आणि आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत समाजात एक वेगळी प्रतिष्ठा मिळविली आहे. तसेच महापूर काळात विद्यापीठाने स्वतंत्र यंत्रणा राबवित दररोज २००० हुन अधिकांना अन्न पुरविले यासोबतच जनावरांसाठी चारा व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून दिली.
संजय घोडावत विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक गावामध्ये जाऊन श्रमसंस्कार, श्रमदान, रस्तासुरक्षा अभियान, मेडिकल कॅम्प, व्यसनमुक्ती कार्यक्रम, नैसर्गिक आपत्ती मदतकार्य, योग, महापुरुष पुतळे स्वच्छता अशा प्रकारची बरीचशी शिबिरे आयोजित केली आहेत. यामाध्यमातून लोकांना स्वच्छतेचे महत्व, चांगल्या सवयी, अध्यात्म, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच संस्कारूपी शिक्षण याची जाणीव करून देण्याचे कार्य केले आहे.