शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच नीतिमूल्यांना महत्त्व द्या: अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज

Spread the love

• डॉ.बापूजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सवाची सांगता
कोल्हापूर • प्रतिनिधी‌
      डिजिटल युगात शैक्षणिक गुणवत्तेवरच शिक्षकांनी नीतिमूल्यांना महत्त्व दिल्यास आदर्श विद्यार्थी घडवता येईल, असे प्रतिपादन कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती होती.
     अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले, बापूजी साळुंखे यांनीही शिक्षणात दूरदृष्टी ठेवून विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच जगण्याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या विचारांचे आचरण करूनच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मार्गक्रमण करत आहे. आदर्श शिक्षक कसा असावा, याचा वस्तुपाठ शिक्षणमहर्षी डॉ. बापूजींच्या तत्वज्ञानातून, कार्यातून आणि विचारातून व्यक्त होत आहे.
      संस्थेचे अध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, बदलत्या शिक्षण प्रणालीबरोबरच कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम सुरू केल्यास रोजगाराच्या नवनवीन संधी मिळू शकतात.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, समाजात जबाबदार नागरिक घडविण्यासाठी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी तळागाळात शिक्षणाची गंगा पोहोचवली. समाजसुधारकांच्या मूल्यांचा आदर्श ठेवून संस्थेने कार्य करावे.
       प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले. ते म्हणाले, ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार’ या हेतूने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद संस्थेची स्थापना केली.
       यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी जन्मशताब्दी समितीच्या अहवालाचे वाचन केले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सव स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. शाहीर आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला. संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी आभार मानले. सौ. शुभदा हिरेमठ व प्रा.महेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!