कोल्हापूरात मतदान केंद्रनिहाय लसीकरणास परवानगी द्यावी

Spread the love

• राजेश क्षीरसागर यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
    महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण  मिळविण्यासाठी राज्यशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने मतदान केंद्रनिहाय लसीकरणाची मोहीम आखली असून, ही मोहीम प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात मतदान केंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरु करण्यास परवानगी देवून आवश्यक प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे सार्वजिनक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी ईमेलद्वारे निवेदन सादर केले आहे.
     या निवेदनात पुढे म्हटले आहे कि, १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स, दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील सर्व नागरिक व ४५ ते ६९ वर्षातील व्याधिग्रस्त नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. तर १ एप्रिलपासून तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरु करण्यात आले. सध्या केंद्र शासनाने १ मे २०२१ पासून १८ वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाचे आदेश दिले आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोल्हापूर शहरात महापालिकेच्या विविध ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातून लसीकरण केले जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरत असल्याने, त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, महानगरपालिका प्रशासनाकडे एक ते दीड हजारच लस साठा उपलब्ध होत असल्याने, बहुतांश नागरिकांना लसीकरणाअभावी परतावे लागत आहे.
      सध्याची परिस्थिती पाहता दि.१ मे पासून लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी लसीकरण केंद्र वाढवणे आवश्यक आहे. याकरिता कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने व्यापक लसीकरण करण्यासाठी कोल्हापूर शहरात मतदान केंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरु करण्यास परवानगीची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. यामुळे व्यापक लसीकरण होवून कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे.
      यासह कोल्हापूर शहरास लसीकरणासाठी प्रशासन सज्ज असून, उर्वरित संपूर्ण शहराचे लसीकरण करण्यास अंदाजे ३ लाख डोस आवश्यक आहेत. आवश्यक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास अख्ख्या शहराचे लसीकरण आठ ते दहा दिवसात पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या बाबींच्या अनुषंगाने कोल्हापूर शहरात मतदान केंद्र निहाय लसीकरण केंद्र सुरु करण्यास परवानगी देवून आणि आवश्यक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी निवेदनात केली आहे. 
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!