गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांची डॉ. वसंतदादा पाटील यांच्‍या स्मृतीस्‍थळास भेट

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
      महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्‍या सांगली येथील स्मृतीस्थळास गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी आपल्या कुटूंबियांसमवेत भेट देऊन अभिवादन केले.
      स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्‍ट्र उभारणीतील सर्वात महत्‍वाचे कार्य म्‍हणजे त्‍यांनी सहकार क्षेत्राचा विकास व विस्‍तार होय. तसेच त्‍यांनी सहकाराच्‍या माध्यमातून  ग्रामीण भागातील कृषी व दुग्‍ध व्‍यवसायाचा विकास साधन्‍याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात सहकाराची बीजे रोवली गेली आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे आज लाखो कुटुंबे सक्षम झाली आहेत. तसेच महाराष्‍ट्राचे नेतृत्‍व करताना दादांनी शेतक-यांच्‍यासाठी दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले.
     यावेळी जुनी आठवण सांगताना विश्वास पाटील म्हणाले की, ज्या दूध संस्थेच्या माध्यमातून माझी गोकूळ दूध संघातील  वाटचाल चालू झाली ती, श्री शाहू छत्रपती सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या., शिरोली दुमाला या संस्थेच्या स्थापनेवेळी  मला स्वर्गीय वसंतदादांनी व त्‍यांचे सहकारी स्वातंत्र्यसेनानी शामराव  पाटील (साखराळे) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यावेळी महाराष्ट्रात एक गाव एक दूध संस्था होती. दुसरी संस्था काढणे त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत शक्य नव्हते. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादांनी तत्कालीन कृषी राज्‍य मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांना सांगून दूध संस्था रजिस्ट्रेशन व संकलनासाठी परवानगी तात्काळ द्या असा आदेश वसंतदादांनी तात्कालीन जिल्हाधिकार्‍यांना काढला. तेव्हा सहाय्यक निबंधक दांडेकर यांनी १० फेब्रुवारी १९७८ रोजी संस्थेस नोंदणी प्रमाणपत्र व संकलनास परवानगी दिली गेली. या सस्थेची ४३ वर्षाची यशस्वी वाटचाल चालू आहे. शाहू दूध संस्थेचा संस्थापक ते महाराष्ट्र राज्यातील सहकारातील अग्रगण्य गोकुळ दूध संघाचे चेअरमन हा राजकीय व सामा‍जिक प्रवास दादांचे विचार व त्‍यांच्‍या सहकार्याची मला नेहमीच आठवण राहील.
      वसंतदादांच्‍या स्मृतीस्‍थळास अभिवादन करताना चेअरमन विश्‍वास पाटील यांच्यासह सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील, श्रीमती जयश्री मदन पाटील, सांगली महानगरपालिकेचे उपमहापौर उमेश पाटील, तुकाराम पाटील (आण्‍णा), शंकरराव पाटील, अरविंद पाटील (पद्माळे), विष्‍णू आण्‍णा खरेदी विक्री संघाचे चेअरमन संग्रामसिंह पाटील, संचालक अशोक पाटील, दादांचे पणतू हर्षवर्धन प्रतिक पाटील, रयत संघाचे संचालक सचिन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुनिल पाटील, राहूल पाटील, पार्थ पाटील तसेच पाटील कुटूंबीय  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!