गोकुळला सर्वतोपरी मदत करणार: आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
      गोकुळ दूध संघाचे कोल्हापूर जिल्ह्यात पशुसंवर्धनमधील काम चांगले आहे, त्यामुळे शासनाच्या सर्व योजना गोकुळमध्ये राबविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. 
      लिंगविनिश्चित विर्यमात्र (सेक्स सोर्टेड सिमेन) नाममात्र किंमतीत दूध उत्पादकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचे हस्ते सचिंद्र प्रताप सिंह तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 
     यावेळी डॉ. परकाळे म्हणाले की, शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केलेली असते परंतु गोकुळमार्फत बऱ्याच योजना स्वखर्चातून राबविल्या जात असून त्यासाठी शासनाकडे आर्थिक मदत न मागितल्याने गोकुळला आजपर्यत अशा अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. सध्या महाराष्ट्र शासन व इस्राइल सरकार यांचेमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायातील तंत्रज्ञान हस्तांतरणाचा सामंजस्य करार करण्याबाबत बोलणी सुरु असून या करारामुळे या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता येईल जे दूध व्यवसायासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण हे गोकुळचे प्रशिक्षण केंद्र येथे देता येईल, परंतु या प्रशिक्षण केंद्राची शासनाकडे नोंदणी असणे आवश्यक असलेचे डॉ. परकाळे यांनी सांगितले. 
     अनुदानावर वैरण बियाणे पुरवठा, मुरघास निर्मिती, सामुहिक जंत निर्मुलन कार्यक्रमासाठी आर्थिक मदत, लाळ खुरकत लसीकरण, गोचीड निर्मुलन मोहीम, तालुका स्तरावर एक्स-रे मशीन, अत्याधुनिक पशुखाद्य तपासणी प्रयोगशाळा अशा विविध बाबींवर सकारात्मक चर्चा झाली.
     यावेळी वैरण विकास उपसंचालक गणेश देशपांडे, अभिषेक डोंगळे, डॉ. प्रकाश साळुंके, मलगोंडा हेगाजे, योगेश खराडे, संग्राम मगदूम आदी उपस्थित होते. 
———————————————– Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!