गोकुळमुळे सीमाभागातील दूध उत्‍पादकांना चांगले दिवस येतील: आम.श्रीमंत पाटील

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर संचलित शिवनेरी कृषी अभिवृध्‍दी क्लस्टर बल्क कुलर संघ, बमनाळ (ता.अथणी, जि.बेळगांव) युनिटचे उद्घाटन आमदार श्रीमंत पाटील यांच्‍या हस्ते व गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थितीत झाले.
      यावेळी कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील म्‍हणाले की, कर्नाटक-महाराष्‍ट्र सीमाभागातील दुग्‍ध व्‍यवसाय म्‍हणावा तसा वाढलेला नाही. येथील जमीन, पाण्‍याची कमतरता व भौगोलिक स्थिती ही त्याची कारणे आहेत. परंतु गोकुळने आपल्या विविध योजना राबवून दुग्ध व्‍यवसायाचे स्‍वरूप बदल्‍याची किमया केली आहे. त्‍यामुळे गोकुळची दूध उत्‍पादकांच्या मनात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. गोकुळमुळे सीमाभागातील दूध उत्‍पादकांना चांगले दिवस येतील. तसेच कर्नाटक शासनाच्‍या दुग्‍ध व पशुसंवर्धन विभागामार्फत सीमाभागातील दूध उत्‍पादन वाढविण्‍यासाठी सर्वोतोपरी गोकुळला सहकार्य करण्‍याची ग्‍वाही आ. श्रीमंत पाटील यांनी दिली व गोकुळच्‍या कामकाजाचे कौ‍तुक केले. 
     यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले की, महाराष्‍ट्र व कर्नाटक सीमाभागात गोकुळने १२ बल्‍क कुलर युनिट चालू केली असून संघ या बल्‍क कुलरमार्फत सरासरी १ लाख ६७ हजार प्रतिदिन दूध संकलन करत असून गोकुळ नेहमीच दूध उत्‍पादकांना त्‍यांच्‍या कष्‍टाचे दाम देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. दूध उत्‍पादकांच्‍या जोरावरच गोकुळचे नाव महाराष्‍ट्रात व इतर राज्‍यात आहे. यामध्ये सीमाभागातील दूध उत्‍पादकांचाही मोलाचा वाटा आहे. दूध उत्‍पादकांनी दूध व्‍यवसाय किफायतशीर होण्‍यासाठी गोकुळच्‍या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन गुणवत्तापूर्ण दूध संघास पाठवावे व गोकुळ निश्चितच दूध उत्‍पादकांना त्यांच्या कष्टाचा मोबदला देईल. दूध व्‍यवसायात महिलांचे योगदान महत्‍वाचे असून व पुढाकार घेऊन दूध व्‍यवसाय वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.
      या कार्यक्रमाचे स्‍वागत व प्रास्ताविक शिवनेरी कृषी बल्‍क युनिटचे संस्‍थापक रामदास आवळेकर यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य विनायक बाग‍डी, सुरेश सलगरे, गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी मनोगत व्‍यक्‍त केली.
      याप्रसंगी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक अथणी शुगर श्रीनिवास पाटील, वर्षाराणी आवळेकर, गोकुळ दूध संघाचे अधिकारी, भागातील दूध उत्‍पादक व इतर मान्‍यवर उपस्थित होते.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!