कोल्हापूर • प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पोलिस आणि महापालिका कर्मचारी दिवसरात्र, ऊन पावसातदेखील ड्यूटी बजावत आहेत . कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या ड्यूटीवर असलेल्या पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ताराबाई पार्क येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या स्व:खर्चातून ताक वाटपाचा उपक्रम राबविला.
खरं तर गोकुळ दूध संघाचे कर्मचारीदेखील कोविडयोद्धे आहेत. गेले दीड वर्षापासून अविरतपणे दूध उत्पादकांकडून दूध घेवून ते मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठेमध्ये विनाव्यत्यय पोहच करत आहेत.
ताराबाई पार्क कार्यालयातील सर्व कर्मचारी एकत्र येत पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांना ताक वाटप करायचे ठरवले आणि नियोजनानुसार ड्यूटीवरील पोलिस व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ताक वाटप केले. या सामाजिक कार्यास संघाचे चेअरमन विश्वास नारायण पाटील (आबाजी) व सर्व संचालका यांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे व्यवस्थापक डॉ. यु. व्ही. मोगले, संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, डॉ. प्रकाश साळुंखे, अशोक पुणेकर आदींसह ताराबाई पार्क कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.