‘गोकुळ’च्या महालक्ष्मी गोल्ड पशुखाद्य दरामध्ये प्रतिकिलो २ रुपये वाढ

Spread the love


कोल्हापूर
     कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)ने महालक्ष्मी गोल्ड पशुखाद्य दरामध्ये प्रतिकिलो २ रुपयांची वाढ केली आहे.
     पशुखाद्य उत्पादनासाठी लागणाऱ्या शेतीपूरक कच्च्या मालाच्या उपलब्धतेमध्ये सातत्याने टंचाई निर्माण होत आहे. याशिवाय इंधन दरात झालेली वाढ, अनुषंगिक वाहतूक खर्चातील वाढ यामुळे ही दरवाढ करणे अपरिहार्य ठरले असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली आहे.
     संघाच्यावतीने उत्पादक सभासदांच्या गाई-म्हशीकरिता महालक्ष्मी गोल्ड पशुखाद्य, मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर, फर्टिमिन व इतर पशुखाद्य पुरविण्यात येते. गेल्यावर्षीच्या तुलनेत कच्च्या मालाच्या दरात सरासरी १५ ते २५ टक्के इतकी वाढ झाली आहे. संघाने आजपर्यंत पशुखाद्य विक्री दरात वाढ केली नव्हती. गेली तीन वर्षे पशुखाद्य दर स्थिर ठेवलेले होते परंतु सध्याचा दर पुढे सुरू ठेवणे संघास आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही त्यामुळे ही दरवाढ करावी लागली आहे.
गोकुळ दूध संघ नेहमीच दूध उत्पादक हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहिला आहे व याकरिताच मागील काही महिन्यांपूर्वी इतर कंपन्यांनी व दूध संघांनी पशुखाद्याचे दर वाढवले होते तरीदेखील दूध उत्पादकांचे हित लक्षात घेवून कच्च्या मालाचे दर वाढलेले असताना देखील, गेल्या काही महिन्यांपासून संघाने पशुखाद्य दरवाढ केली नव्हती. साधारणपणे नोव्हेंबर – डिसेंबर या कालावधीमध्ये कच्या मालाची आवक वाढून दर कमी होतील अशी आशा होती परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे कच्च्या मालाच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे अपरिहार्य कारणास्तव महालक्ष्मी गोल्ड पशुखाद्य दरामध्ये प्रति किलो २ रुपये वाढ करावी लागत आहे. सध्या बाजारातील इतर कंपनीचे पशुखाद्य जे संघाच्या पशुखाद्याच्या गुणवत्तेचे आहे. त्याची किंमत प्रति किलो १ ते २ रुपये जास्त आहे.
     ही दरवाढ करून संघाचे पशुखाद्य ना नफा ना तोटा या तत्त्वाप्रमाणे दूध उत्पादकांना मागणीनुसार पोहोच करीत आहोत, याची खात्री बाळगावी व जास्तीत जास्त महालक्ष्मी गोल्ड पशुखाद्याचा वापर करून जनावरांचे पालन-पोषण व दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन चेअरमन विश्वास पाटील यांनी केले आहे.
——————————————————-

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!