• म्हैस दूध २ तर गाय दूध खरेदी दरात १ रूपये दरवाढ
कोल्हापूर • प्रतिनिधी
गोकुळच्यावतीने दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. म्हैस दूधासाठी २ रूपये तर गाय दूध खरेदी दरात १ रूपये वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा दूध उत्पादकांना होणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. दूध खरेदी दरातील ही वाढ ११ जुलै २०२१ पासून असल्याची माहिती गोकुळचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्यासह संचालक व मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, दूध उत्पादकांना दूध खरेदी दरात वाढ देताना दूध विक्री दरात २ रूपये वाढ करण्यात आली होती. ही दरवाढ मात्र कोल्हापूर जिल्हा वगळून मुंबई व पुणे भागासाठी आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादकांना २ रूपये दरवाढ देण्याचे आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाची पूर्तता नव्याने सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाने केली आहे.