कुस्तीशौकिनांसाठी खूशखबर! कोल्हापूरात नोव्हेंबरमध्ये होणार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा

Spread the love

• पुरुष-महिला विभागांत ३०० हून अधिक मल्ल सहभागी
कोल्हापूर • प्रतिनिधी
      राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूरच्या खासबाग मैदानात यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील ‘मातीतील कुस्ती स्पर्धां’चे आयोजन करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यामध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.
      सोमवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत नोव्हेंबर महिन्यात खासबाग मैदान कोल्हापूर येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करू, अशी ग्वाही खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी खा.संभाजीराजे छत्रपती यांना दिली. पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांच्या या स्पर्धा असून देशभरातील नामांकित असे ३०० हून अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील, असे खा.संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले. याबाबत पुढील नियोजन करण्यासाठी खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकारातून कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी व राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे सचिव यांची संयुक्त बैठक २ मे रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
      काही दिवसांपूर्वी याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खा. बृजभूषण यांची भेट घेऊन राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी कुस्तीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली होती व कुस्ती या क्रीडा प्रकारच्या उद्धारासाठी महाराजांनी जे उत्तुंग कार्य केले आहे, त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षात कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानात राष्ट्रीय स्तरावरील मातीतील कुस्ती स्पर्धा भरवावी, अशी मागणी केलेली होती. त्यावेळीच खासदार बृजभूषण यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!