मुंबई :
सन २०२२ हे वर्ष लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृतिशताब्दी वर्ष असून राजर्षी शाहू महाराजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ६ मे २०२२ रोजी ‘‘कृतज्ञता दिन’’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या स्मृती शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने राजर्षी शाहू महाराजांचे गौरवगाथा क्रांती खंड प्रकाशन करण्याबाबत मंत्रालयात आज राज्याचे उच्च व तंत्रषिक्षण मंत्री उदय सामंत आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रषिक्षण विभागाचे उपसचिव श्री.लुबाळ, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, विभागीय सहसंचालक, उच्च व तंत्रशिक्षण सोनाली राडे यांचेसह इतर संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
राजर्षी शाहू महाराज यांनी राज्यारोहणाची सुत्रे हाती घेतल्यानंतर राजर्षी शाहूंनी सामाजिक सुधारणांना अग्रक्रम देत विविध क्षेत्रात सुधारणेचे नवे पर्व सुरू केले. प्रारंभीच्या २ वर्षामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील वेठबिगारीची पध्दत बंद करून गावकऱ्यांच्या शोषणास पायबंद घातला. तसेच लोककल्याणाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणेकरीता राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, क्रीडा आरोग्य, जलसिंचन, सामाजिक क्षमता याकरीता यामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणले. तसेच १९०२ साली कोल्हापूर संस्थानात बहुजनांकरीता नोकरीमध्ये ५० टक्के आरक्षणाची तरतूद शाहू महाराजांनी केली.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आपले मत व्यक्त करताना, सामाजिक समतेचे अग्रणीदूत, लोकोत्तर युगपुरूष राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान सामाजिक क्रांतीला चालना देणारे ठरले आहे. त्यामुळे राजर्षी शाहूंचे विचार, आचार, दृरदृष्टी, लोककल्याणकारी सुशासन यांची माहिती समाजात प्रसारीत करण्याकरीता शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूरमध्ये गौरव यात्रा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये महाराजांच्या गौरवगाथा क्रांती खंडाचे प्रकाशन करून कोल्हापूर जिल्हयातील सर्व शाळा व महाविदयातील ग्रंथालयांना ५००० खंडाचे वाटप करण्यात यावे,अशी मागणी केली.
या बैठकीत राज्याचे उच्च व तंत्रषिक्षण मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार होण्याकरीता कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविदयालयातील ग्रंथालयांना ५००० गौरवगाथा क्रांती खंडाचे वाटप करण्याबाबत आयोजन करणेबाबतच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
——————————————————-