कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री

Spread the love


• मंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
कोल्हापूर • (जिमाका)
       जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी राज्य शासन तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधीची उपलब्धता केली जात आहे. जिल्ह्यात सर्वसाधारण योजना सन २०२१-२२ अंतर्गत ३७३ कोटींचा निधी विविध विकासाच्या कामावर खर्च करून त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असून या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
       महाराष्ट्र राज्याच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्तचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू स्टेडियम येथे सकाळी आठ वाजता झाला. यावेळी, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस विभाग, वाहतूक विभाग, वन विभाग, गृहरक्षक दलाने संचलन केले व मानवंदना दिली.
      यावेळी, समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचन तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या महिलांसाठी विशेष बस सेवेचे लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विभागातील पुरस्कारार्थी व उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
      पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सन २०२१-२२ मध्ये विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात आल्या असून त्यामध्ये वन अमृत प्रकल्प आणि वनक्षेत्रातील लोकांचा शाश्वत विकास, भाताच्या स्थानिक वाणाचे जतन आणि शाश्वत रोजगार प्रकल्प, वन्य रेशीम म्हणजेच टसर निर्मिती, शाश्वत रोजगार आणि वनसंवर्धन प्रकल्प, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी उपाययोजना, जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे, शालेय शिक्षणात डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर इ. योजनांचा समावेश आहे.
      ‘कृतज्ञता पर्व’  – लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी असून त्यानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्तांने १८ एप्रिल ते २२ मे २०२२ कालावधीत कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देऊन उद्योगाला चालना देण्यासाठी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने सुरु केलेल्या शाहू मिलमध्ये कृतज्ञता पर्वाचे कार्यक्रम साजरे केले जात आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे. या माध्यमातून शाहू महाराजांचे कार्य सामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित केलेल्या शाहू महाराज कृतज्ञता पर्वासाठी राज्य शासनाने रु. ५ कोटींचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असून या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम सुरु राहणार आहेत.
      लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यातील ४६ मागासवर्गीय अनुदानीत वसतीगृहांना जिल्हा वार्षिक योजनेमधून ३ टक्के नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी अद्यावत संगणक देण्याची योजना हाती घेतली आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने कृषि व्यापार, उद्योग घटकांच्या वाढीसाठी अनेक उपक्रम, योजना राबवून या भागाचा विकास केला आहे. त्यांच्या संकल्पनेतील विकास घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया, हीच कृतज्ञता पर्वात राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
      कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी शासनाच्या प्रदत्त समितीने रु. २१२ कोटीच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच विस्तारीकरणाचे काम पूर्ण होणार असून कोल्हापूरला देशातील एक प्रमुख विमानतळ करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पूर्वीची १३७० मी. धावपट्टी आता १९३० मी. पर्यंत वाढविण्यात आली आहे. नाईट लँडिंगची चाचणी यशस्वी झाली असून लवकरच ही सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी आपत्कालीन परिस्थिती, सणवार अशा कोणत्याही वेळी कर्तव्यावर असतात. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त व उत्कृष्ट दर्जाची घरे आणि सुसज्ज कार्यालये मिळण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी निवासस्थाने प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. कोल्हापूरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी सुमारे १२ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमधून पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या सुमारे ५ कोटी रुपयांची अद्ययावत वाहने कोल्हापूर पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली. यामुळे, पोलीस दल अधिक सक्षम व गतीमान होऊन काम करेल, असा विश्वास श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून वन्यजीव निरीक्षण करिता 100 ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यात आले होते. वन्यजीव विभागाच्या या कॅमेऱ्यात नुकताच राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे. वनाचे संरक्षण, कुरण विकास, प्रशिक्षित आणि सतर्क वन कर्मचारी, वणव्याचे घटलेले प्रमाण या सर्व बाबींमुळे राधानगरीचा अधिवास वाघासाठी पूरक झाला आहे. 
      कोल्हापुर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधा विकास योजनेंतर्गत इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या स्टेडियमच्या माध्यमातून क्रीडा संस्कृती जोपासत खेळाडू आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील आठ बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ११ कोटी ९४ लाख रुपयांचा मंजूर झाला असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.
       प्रारंभी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर परेड कमांडर यांच्या समवेत पालकमंत्री यांनी परेडचे निरीक्षण केले व त्यानंतर परेड संचलन झाले. यावेळी पालकमंत्री महोदय यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अन्य मान्यवर यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!