कडुलिंबाच्या पानांपासून बनवल्या धान्य साठवणुकीच्या गोळ्या

Spread the love

• निसर्गमित्र संस्थेचा उपक्रम
कोल्हापूर • प्रतिनिधी
      येथील निसर्गमित्र संस्थेतर्फे गेली तीन वर्षे गुढीपाडव्याच्या निमित्ताने वापरली जाणारी कुडुलिंबाची पाने अनेक निसर्गप्रेमी कुटुंबांकडून निर्माल्य म्हणून टाकला जातो. हा टाकला  जाणारा अडीचशे किलो कडुलिंबाचा पाला एकत्रित करून ती पाने वाळवून, त्याची बारीक पावडर बनवली. त्यामध्ये डिंक मिसळून त्यापासून सात हजार गोळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी दिली.
      ते म्हणाले की, या गोळ्यांचा उपयोग साठवणुकीच्या धान्याला किड लागू नये,  धान्याता आळी होऊ नये आणि अधिककाळ सुरक्षित राहण्याकरिता होतो. तसेच या गोळ्या कडुलिंबाच्या असल्यामुळे पूर्णतः नैसर्गिक आहेत. सध्या बोरिक पावडर व पाऱ्याच्या गोळ्या यासारख्या रासायनिक आणि आरोग्याला हानिकारक अशा पदार्थांचा साठवणुकीच्या धान्यावर मारा करून ते धान्य साठवले जाते. परंतु असे अन्न खाल्यामुळे आपल्या शरीरावर अनेक विघातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कडूलिंबाच्या गोळ्या या उत्तम पर्याय ठरत आहेत. यंदा या प्रयोगाचे तिसरे वर्ष आहे.
      आदर्श सहेली मंचच्यावतीने या कडूलिंबाच्या पानांचे संकलन करून, ही पाने वाळवून, त्यापासून पावडर तयार करण्यात आली. कोल्हापूरमधील   कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये असणाऱ्या बी वेल फार्मासिटिकल कंपनीमध्ये ही पावडर गोळ्या बनवण्याकरिता देण्यात आली. या गोळ्या तयार करून कंपनीच्यावतीने संस्थेला विनाशुल्क देण्यात आल्या. त्या पावडरमध्ये केवळ डिंक व पाण्याचा वापर करून मिश्रण तयार करून गोळ्या तयार करण्यात आल्या. या गोळ्यांचे संस्थेच्यावतीने रद्दीपासून कागदी पिशव्या तयार करून पर्यावरण पूरक पॅकिंग करून संस्थेकडे निर्माल्य जमा केलेल्या निसर्गप्रेमींना सदिच्छा भेट म्हणून वितरित करण्यात आल्या असल्याचे अनिल चौगुले यांनी सांगितले.
      या संपूर्ण प्रयोगासाठी विलास डोर्ले, यश चौगुले, राणिता चौगुले, पराग केमकर यांनी परिश्रम घेतले.
——————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!