आ.ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून संभाजीनगर येथे रिक्षाचालक अनुदान नाव नोंदणी सुविधा सुरू


कोल्हापूर • प्रतिनिधी
     आ.ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून संभाजीनगर येथे रिक्षाचालक अनुदान नाव नोंदणी सुविधा सुरू करण्यात आली असून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली. जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.ऋतुराज पाटील यांनी केले आहे.
      कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे रिक्षा व्यावसायिकांवर परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने रिक्षा परवानाधारकांना रु. १५००/- चे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा व्यावसायिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे. ही मदत कोल्हापुरातील सर्व पात्र रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी  संभाजीनगर येथील इंदिरासागर हॉल येथे तीन दिवसीय नोंदणी अभियान सुरू करण्यात आले.
     यासाठी ऑटोरिक्षा वाहन क्रमांक, रिक्षाचे परमिट, आर.सी. बुक, लायसन्स, बँक पासबुक आणि आधार क्रमांक सोबत घेऊन ही ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित माहितीची पडताळणी झाल्यानंतर रिक्षाचालकांना खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा करण्यात येईल, असेही आ. पाटील यांनी सांगितले.
     यावेळी माजी नगरसेविका जयश्री चव्हाण, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, दुर्वास कदम, मधुकर रामाने, दिग्विजय मगदूम, दीपक थोरात, अभिजित देठे, पार्थ मुंडे, देवेंद्र सरनाईक, रोहित गाडीवडर, उदय पोवार, कुणाल पत्की, अक्षय शेळके, तानाजी लांडगे, पूजा आरडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *