द्राक्ष महोत्सवाचा गोडवा २१ लाखांवर! आता मे महिन्यात ‘आंबा महोत्सव’


कोल्हापूर • प्रतिनिधी
     उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू स्मारक भवन येथे २६ ते ३० मार्च या कालावधीत ‘कोल्हापूर द्राक्ष महोत्सव २०२१’चे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात २१ लाखांची उलाढाल झाली. एकंदरीत द्राक्ष महोत्सवात द्राक्षांचा गोडवा वाढला.
     दरम्यान, सिने अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी द्राक्ष महोत्सवास भेट दिली.
     कोल्हापूर विभागामध्ये मे महिन्यात हापूस व केशर आंबा उत्पादकांसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पणजी (गोवा) व बेळगाव येथे ‘आंबा महोत्सव २०२१’चे आयोजन प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे  उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली.
     सुभाष घुले म्हणाले की, द्राक्ष उत्पादकांना चांगला दर मिळावा म्हणून उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत गोवा व कोल्हापूर येथे द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगांव,पलूस व जत तालुक्यातील एकूण १८ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. महोत्सवात एकूण ३०.१०५ मे. टन द्राक्षांच्या विक्री करण्यात आली. द्राक्ष उत्पादकांना सरासरी प्रति किलो ६० रुपये दर मिळाला. तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीतून १८ लाख रुपये प्राप्त झाले. द्राक्ष महोत्सवामध्ये १ मेट्रिक टन बेदाण्याची विक्री झाली असून उत्पादकांना प्रति किलो सरासरी २६० रुपये दर मिळाला. बेदाणा विक्रीतून अंदाजे २.७३ लाख रुपये प्राप्त झालेले आहेत. कोल्हापूर द्राक्ष महोत्सव एकूण २०.७३ लाख रुपयांची उलाढाल झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *