भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा


कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
     भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. छत्रपती शाहू स्टेडियमवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
      ते म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व नागरिक, सेवाभावी संस्था, प्रशासन, विशेषत: आरोग्य विभाग, सर्वच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या सर्वांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. सर्व कोरोना योद्यांनी अहोरात्र प्रयत्न करून जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ‘आम्ही कोल्हापूरी जगात भारी’ ही उक्ती सार्थ ठरविली आहे. जिल्ह्याचे कोरोना रिकव्हरी प्रमाण ९६.४ टक्के असून जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ५९८ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात नव्या उद्योगात २६१.६ कोटींची गुंतवणूक झाल्याने ४ हजार ९२७ रोजगार निर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी करून प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
       येथील छत्रपती शाहू स्टेडीयमवर  ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी –कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उपस्थित स्वातंत्र्य सैनिक-कुटुंबियांना पालकमंत्र्यांनी गुलाब पुष्प देवून स्वागत केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *