गोकुळच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍यावतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राजर्षी छञपती शाहू महाराजांच्‍या १४७ व्‍या जयंतीनिमित्त गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील व संचालक यांच्‍या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करण्‍यात आले.
     यावेळी बोलताना चेअरमन श्री. पाटील म्‍हणाले सामाजिक सुधारणांबरोबरच राजर्षी शाहू महाराज यांनी शेती व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला तसेच महाराजांनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात कायापालट करणारा उपक्रम ठरला. शेतीविषयक धोरणे राबवून त्यांनी कोल्हापूर सुजलाम्‌-सुफलाम्‌ केले. शाहू महाराज हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्‍तंभ होते. त्यांनी घेतलेले अनेक क्रांतिकारक निर्णय व कल्याणकारी हुकूम आजही समाजाला मार्गदर्शक आहेत.
     यावेळी संघाचे पशुसंवर्धन विभागाचे सहा. व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश दळवी यांनी प्रास्‍ताविक व संचालकाचे स्‍वागत केले तर आभार संकलनचे सहा. व्‍यवस्‍थापक डी.डी. पाटील यांनी मानले.
      यावेळी गोकुळचे जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील- चुयेकर, किसन चौगले, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो उर्फ वसंत खाडे, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, व्‍यवस्‍थापक पशुसंवर्धन डॉ. यु. व्‍ही. मोगले, संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्‍ही. तुरंबेकर यांच्यासह संघाचे अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *