आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पार्थिवाचे पालकमंत्र्यांनी घेतले अंत्यदर्शन

Spread the love

• पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले जाधव कुटुंबियांचे सांत्वन
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या घरी भेट देवून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दिवंगत आमदार जाधव यांचे पुत्र सत्यजित, मुलगी अस्मिता मोरे, आई प्रमिला जाधव तसेच कुटुंबियांशी संवाद साधून पालकमंत्री श्री. पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले.
      तत्पूर्वी, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करुन पालकमंत्री सतेज पाटील यांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, खासदार संजय मंडलिक, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
     दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली वाहिली.
     कोल्हापूर उत्तरचे आमदार, उद्योजक आणि सहकारी चंद्रकांत जाधव यांचे आकस्मिक निधन अत्यंत धक्कादायक आहे. आमदार जाधव हे अत्यंत शांत, मनमिळावू व लोकप्रिय व्यक्तिमत्व होते.  राजकीय, क्रीडा, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे काम कोल्हापूरकर कधीच विसरणार नाहीत. त्यांच्या जाण्याने एक जिंदादील सहकारी आज गमावला आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांची उणीव मला सदैव भासणार आहे, अशा शब्दांत दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना पालकमंत्री श्री. पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!