कोल्हापूर जिल्ह्यातील हासूर सासगिरी पहिले थकबाकीमुक्त गाव

Spread the love

• महावितरणने मानले गावकऱ्यांचे आभार
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्ह्यातील हासूर सासगिरी हे पहिले वीजबिल थकबाकीमुक्त गाव ठरले आहे. गावातील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांनी टाळेबंदी कालावधीतील थकीत वीजबिलासह चालू वीजबिलांचा भरणा केला आहे. महावितरणने गावकऱ्यांचे आभार मानले आहेत. जनमित्र यशवंत सावंत यांचा पाठपुरावा, ग्राहकसेवेमुळे हे शक्य झाले आहे.
     गडहिंग्लज तालुक्यात सामानगड किल्ल्याच्या पायथ्याशी, डोंगरांच्या कुशीत हासूर सासगिरी हे गाव वसलेलं आहे. गावची लोकसंख्या जवळपास ११०० इतकी आहे. महावितरणच्या नेसरी उपविभागातील महागाव शाखा कार्यालयातंर्गत गावाचे वीज वितरणाचे कामकाज चालते. गावातील २४५ वीज ग्राहकांना वीजसेवा पुरविली जाते.
      घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा या वर्गवारीतील १५३ वीज ग्राहकांनी २ लक्ष ३ हजार ५४८ रुपये थकबाकी भरणा केली आहे. गावातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्या सह्योगातून कुठल्याही अनुचित प्रकाराविना हासूर सासगिरी थकबाकीमुक्त झाले आहे. गावातील प्रतिष्ठ‍ित नागरिक विष्णू कदम यांनी गावातील वायरमन श्री. सावंत यांनी चांगली सेवा दिल्यामुळेच थकबाकी शून्य झाली, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी गावातील शेतीपंपाचीही थकबाकी शून्य करण्याचे आश्वासन दिले आहे. गावातील ९४ शेतीपंप ग्राहकांकडे वीज बिलाची १२ लक्ष ५५ हजार थकबाकी आहे.
     कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या हस्ते जनमित्र यशवंत सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय अभियंता संदिप दंडवते, शाखा अभियंता संजय पाटील यांच्यासह जनमित्र उपस्थित होते. हासूर सासगिरी थकबाकीमुक्त झाल्याने मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी गावकऱ्यांचे आभार मानून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!