कोल्हापूर • प्रतिनिधी
ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ रहावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा प्रकारची आरोग्य शिबीरे घेवून, निकोप समाज निर्मितीसाठी भागीरथी महिला संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी केले. भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, तसेच मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने सालपेवाडी येथे आयोजित आरोग्य शिबीर प्रसंगी त्या बोलत होत्या.
भुदरगड तालुक्यातील सालपेवाडी येथे भाजपच्या सेवा समर्पण अभियान अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केल्याबद्दल सौ. अरूंधती महाडिक यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. गोरगरीबांना दवाखान्याचा खर्च परवडत नाही. अशा गरजू नागरीकांसाठी हे आरोग्य शिबीर असून, ग्रामस्थांनी या शिबीराचा लाभ घेण्याचं त्यांनी आवाहन केले.
रोटरी क्लबच्या अध्यक्षा भारती नायक, मीरा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी डॉ, संदीप खोत, आशावरी ठोंबरे या तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थितांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषध देण्यात आली. ३०० महिला आणि पुरुषांनी शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, भगवान शिंदे, सरपंच काजल शिंदे, पौर्णिमा शिंदे, लता शिंदे, अमृता इंदूलकर, शितल देसाई, रुपाली सावंत, सरिता कांबळे, पुष्पा गोरे, संभाजी पाटील, संग्राम शिंदे, युवाशक्ती अध्यक्ष नंदकुमार शिंदे, प्रवीण आरडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि युवाशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.