• शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृह येथे सुनावणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता प्रारुप प्रभाग रचना १ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या प्रभाग रचनेवर १ ते १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार या कालावधीत प्रारुप प्रभाग रचनेवर ११५ हरकती व सुचना प्राप्त झाल्या आहेत. या प्राप्त झालेल्या हरकती-सुचनांवर गुरुवारी (दि.२४) सुनावणी घेण्यात येणार आहे.
याबाबत राज्य निवडणूक आयोगाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना सुनावणी घेण्यासाठी प्राधिकृत केले आहे. तसेच विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात येणार आहे.
गुरुवारी (दि.२४) निवडणूक कार्यालयाकडे ११५ हरकतदार यांच्या अर्जावर शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृह येथे सकाळी १० वाजलेपासून सुनावणी घेण्यात येणार आहे. प्राप्त ११५ हरकतदार यांना सुनावणीची वेळ व ठिकाण लेखी पत्राने उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. तरी सर्व हरकतदार यांनी त्यांना निश्चित करुन दिलेल्या वेळेनुसारच सुनावणीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.