हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची अॅपल हॉस्पिटल्समध्ये सुविधा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    अॅपल हॉस्पिटल्सला हृदय प्रत्यारोपण (हार्ट ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया करण्यास शासनाकडून परवानगी मिळाली आहे. या सुविधेमुळे कोल्हापूर हे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपलब्ध असणारे पुणे ते बेंगलोर दरम्यानचे एकमेव शहर ठरले आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे प्रमुख  कार्डीऑलॉजिस्ट डॉ. अशोक भूपाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. महादेव दीक्षित व गीता आवटे उपस्थित होत्या.
     डॉ. भूपाळी म्हणाले की, तरुणाईमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये हार्ट अॅटॅक, डायलेटेड कार्डीओमायोपथी यासारख्या विविध प्रकारच्या हृदयविकारांचा समावेश आहे. बहुतांशी रुग्णांमध्ये अॅन्जीओप्लास्टी, बायपास  शस्त्रक्रिया, झडप बदलणे यासारख्या उपचारानंतर बऱ्याचदा हृदयाचे कार्य पूर्ववत होते. पण काही रुग्णांची हृदयाची कार्यक्षमता केवळ २० टक्के किंवा त्यापेक्षाही कमी होते. अशा रुग्णांना कोणतीही औषध प्रणाली लागू पडत नाही. या स्थितीला ‘रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर’ असे संबोधले जाते. या रुग्णांचा कालांतराने मृत्यु होतो.
‘रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर’, डायलेटेड कार्डीओमायोपथी (हृदयाच्या स्नायूंचा आजार) किंवा अति गंभीर अवस्थेतील जन्मजात हृदयविकार असणाऱ्या रुग्णांसाठी हृदय प्रत्यारोपण (हार्ट ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उपयोगी ठरतो.
      अॅपल हॉस्पिटल्स येथे या शस्त्रक्रियेसाठी सुप्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ. महादेव दीक्षित उपलब्ध असणार आहेत. त्यांच्यासोबत हार्ट सर्जन डॉ.अमृत नेर्लीकर, हृदयविकार तज्ञ डॉ.अशोक भूपाळी, डॉ.अलोक शिंदे, डॉ. विनायक माळी, डॉ. शीतल देसाई तसेच तज्ञ नर्सेस, परफ्युजनिस्ट यांची  टीम उपलब्ध आहे. तसेच येथे अत्यंत प्रगत अशी दोन मोड्युलर ऑपरेशन थियेटर व शस्त्रक्रिया पश्चात देखभालीसाठी अद्ययावत आय.सी.यु. उपलब्ध आहे.    
      याविषयी अधिक माहिती देताना  हार्ट सर्जन डॉ.महादेव दीक्षित म्हणाले कि, मी माझ्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास २५,००० हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. बंगलोर येथे कार्यरत असताना हृदय प्रत्यारोपणशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. ही सुविधा पूर्वी कोल्हापुरात उपलब्ध नसल्याने ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे हृदय मुंबई, बेंगलोर, चेन्नई या शहरात विमानाने पाठवावे लागत असल्याने बराच कालावधी लागत असे. परंतु आता कोल्हापुरातच हृदय प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध झाल्याने ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाचे हृदय काढल्यानंतर प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास लागणारा कालावधी हा बराच कमी होणार आहे. हि बाब अत्यंत महत्वाची आहे कारण ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाचे हृदय काढल्यानंतर ६ तासांच्या आत त्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण होणे हे अनिवार्य असते. तसेच शस्त्रक्रियेच्या खर्चाव्यतिरिक्त विमान सुविधा उपलब्ध करण्यासाठीचा मोठा आर्थिक भार रुग्णावर पडायचा तो कमी होईल.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!