गोकुळच्‍या महालक्ष्‍मी पशुखाद्याची आर्थिक वर्षात विक्रमी विक्री

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     अनेक नामांकित खाजगी कंपन्‍यांना टक्‍कर देत गोकुळच्‍या महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखान्‍याने सन२०२०-२०२१ या आर्थिक वर्षात २५ लाख महालक्ष्‍मी गोल्‍ड पशुखाद्य पोत्‍यांची विक्रमी विक्री करत आपल्‍या गुणवत्‍तेची व कामाची मोहर दुग्‍ध व्‍यवसायात उठवली आहे.
       गतसाली कोरोनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्‍कळीत झाले होते. वर्षभर चाललेल्‍या या लॉकडाऊनच्‍या काळातसुद्धा गोकुळ दूध व महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना मात्र गतिमान होवून आपल्‍या दूध उत्‍पादकांपर्यंत पशुखाद्य पोहोचवायचे कार्य अखंडपणे करत होता. वेळोवेळी येणाऱ्या अडचणींवर मात करत २५ लाखांपेक्षा जास्‍त पशुखाद्य पोत्‍यांची विक्री करत दूध उत्‍पादकांना दिलासा दिला आहे.
      संघाच्‍या गडमुडशिंगी व कागल एमआयडीसी या दोन ठिकाणी महालक्ष्‍मी पशुखाद्य उत्‍पादित केले जाते. त्‍याबरोबर जनावरांना त्‍यांच्‍या शरीर पोषणाबरोबर दूध वाढीसाठी कारखान्‍यामध्‍ये टी.एम.आर. ब्‍लॉक, फर्टीमिन प्‍लस, सिल्‍वर रेशन पॅलेट व लहान वासरांसाठी मिल्‍क रिप्‍लेसर, काफ स्‍टार्टर व फिडींग पॅकेज उत्‍पादित केले जाते. या सर्व उत्‍पादनांची गुणवत्‍ता राखण्‍यासाठी संघाने ISO बरोबर BIS स्‍टँडर्डसाठी नोंदणी केली असून, यापुढे चांगल्‍या गुणवत्‍तेचे पशुखाद्य गोकुळच्‍या दूध उत्‍पादकांना त्‍यांच्‍या गाई व म्‍हैशींसाठी उपलब्‍ध केले जाईल, असे महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखान्‍याचे व्‍यवस्‍थापक डॉ.व्‍ही.डी.पाटील यांनी सांगितले.
       यासर्व यशामागे सर्व दूध उत्‍पादक, संस्‍था कर्मचारी, पशुखाद्य व संकलन स्‍टाफ यांचे श्रेय असून यापुढील काळात अधिक गुणवत्‍ता व अचुक वितरण व्‍यवस्‍था कार्यान्वीत केली जाईल, असे गोकुळचे विद्यमान चेअरमन रविंद्र आपटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!