महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व तरुणांचे मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड: पालकमंत्री

Spread the love

• खा.शरद पवारांसह मान्यवरांकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन
कोल्हापूर • (जिमाका)
     ज्येष्ठ नेते, विचारवंत प्रा.एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी अंत्यदर्शन घेतले. यानंतर त्यांनी दिवंगत प्रा.एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.
      शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे कैवारी, पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन. डी. पाटील सर यांचे निधन अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व तरुणांचे मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले. समाजाच्या हितासाठी अखेरपर्यंत सरांनी रस्त्यावर उतरून लढाई केली. कामगार-शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चे, आंदोलने करत न्याय भूमिका घेतली. अंधश्रद्धा निर्मूलन, सीमाप्रश्न अशा अनेक प्रश्नांवर लढा उभारणारे अभ्यासू आणि वैचारिक, कणखर व्यक्तिमत्व आमच्यासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक होते.
      कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटक शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे, हे त्यांनी कृतीतून करून दाखविले. सर आज आमच्यात नाहीत ही भावना अत्यंत वेदनादायी आहे, अशा शब्दांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
      मंगळवारी (दि.१८) दिवंगत ज्येष्ठ नेते एन. डी.पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मर्यादित उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी गर्दी करु नये, कोरोनाचे नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
                खा. पवार यांनी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन…..
     ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिवंगत ज्येष्ठ नेते, विचारवंत प्रा.एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली वाहिली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही दिवंगत ज्येष्ठ नेते पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
           मान्यवरांकडून कुटुंबियांचे सांत्वन…..
     ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी दिवंगत एन. डी. पाटील यांच्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन सांत्वन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रा.एन.डी. पाटील यांचे कार्य व योगदानाचे स्मरण करुन आठवणींना उजाळा दिला. यावेळी दिवंगत प्रा.एन.डी. पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास पाटील, यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!