नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू मिळेल: प्रशासक डॉ. बलकवडे


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शहरामध्ये नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याचे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
      शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरीक जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्याच्या नावाखाली बाहेर पडतात. महापालिकेने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्यावर वेळोवेळी दंडात्मक कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर काही नियमांचे उल्लघंन करणारी दुकानेही सील केलेली आहेत. अनावश्यक गर्दीमुळे शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढू नये व त्याचबरोबर कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी अनावश्यक गर्दी टाळणे आवश्यक आहे. या अनुषंगाने भाजीपाला, फळे, किराणामाल, दूध इत्यादींची दैनंदिन गरज पाहता. घरी बसून नागरिकांना कशी सेवा देता येईल यासाठी घरपोच जीवनावश्यक साहित्य कसे नागरिकांपर्यंत पोहच करता येईल यासाठी संबंधीत नोडल अधिकाऱ्यांची स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित केली होती.
      प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी या अनुषंगाने सर्व उपशहर अभियंता व नोडल अधिकाऱ्यांनी काय नियोजन करण्यात आले आहे याचा आढावा घेतला. गुरुवार (दि.६)पासून या घरपोच सेवेला सुरुवात करण्यात येणार आहे. नागरीकांनी जीवनावश्यक साहित्य आपल्या घरापर्यंत पोहचविण्याचा महापालिकेने नियोजन केले आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी सर्व मार्केटमधील भाजी विक्रेते यांच्याशी चर्चा करुन घरपोच भाजी विक्री करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांनी घरपोच गाडीद्वारे भाजी विक्री करण्यास सहमती दर्शवली आहे.
     त्याचबरोबर महापालिका ॲपद्वारे प्रभागातील भाजी, फळे, किराणा स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स यांचे नंबर्स जाहिर करणार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा वापर करुन घरी सुरक्षित राहून घराजवळील दुकानातून साहित्य मागविता येईल. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर अनावश्यक गर्दी न करता घरी बसून सुरक्षित राहून या सेवेचा लाभ घ्यावा. स्वत:ला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे अवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक दुकाने सोडून नियमांचे उल्लघंन करणारी दुकाने सील करण्यात येतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
      यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, उपशहर अभियंता नारायण भोसले, हर्षजीत घाटगे, एन. एस. पाटील, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. विजय पाटील, अतिक्रमणप्रमुख पंडीत पोवार, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल, सहा.वाहतूक निरिक्षक सुनिल पाटील, अनिल बोरचाटे, आरोग्य निरिक्षक राजेंद्र पाटील, गीता लखन आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *