कोल्हापूर • प्रतिनिधी
होमिओपॅथी संशोधनाचे कार्य संख्याच्या स्वरुपात अधिक प्रभावीपणे मांडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडन्टस असोसिएशनने (होमेसा) आयोजित केलेल्या ‘होमेसाकॉन २०२१’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले. परिषद होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, ताराराणी चौक, कोल्हापूर येथील सभागृहामध्ये संपन्न झाली. परिषदेचे औपचारिक उद्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.
होमिओपॅथसनी आयुष्यभर नवनवे शिकत राहावे व स्वतःचे वैद्यकीय ज्ञान सतत अपडेट ठेवून संशोधनाशी नाते जोडावे, ज्यामुळे संपूर्ण समाज आरोग्यदायी राहील. जगाच्या तुलनेत कोरोनावर अधिक प्रभावीपणे नियंत्रण करण्यात भारत यशस्वी ठरला आहे. आपल्याकडील उत्कृष्ट नियोजनामुळे हे शक्य झाले. त्याचवेळी कोरोना बरे करण्यासाठी कोणते क्षेत्र प्रभावी ठरले हे लगेचच सांगणे कठीण आहे. मात्र या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील होमिओपॅथीसह सर्वच विभागाचे महत्त्व वाढले आहे हे नाकारून चालणार नाही. कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले. सर्व औषधप्रणालीचे डॉक्टर, रुग्णालये, वैद्यकीय संशोधक आणि औषध निर्माते यांनी एकत्र येऊन काम केल्यास सुलभ व व्यापक आरोग्यसेवा करण्यास मदत होईल, असेही कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले.
कोरोनाने मानवाला व्हर्च्युअल, ई लर्निंग तसेच इंटरअॅक्च्युअल जगायला शिकवले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी होमिओपॅथिसह वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे. होमिओपॅथसनीदेखील वैद्यकीय क्षेत्रात होणारे नवनवीन बदल आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा रुग्णांना तत्काळ होण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठ नाशिकचे होमिओपॅथी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. धनाजी बागल यांनी केले.
कोरोना बरा झाल्यानंतर उद्भवलेल्या इतर गुंतागुंतीच्या आजाराबद्दलचे औषधोपचार व त्यासाठीचे परिणाम सांगलीचे छातीरोग तज्ञ डॉ. पृथ्वीराज मेथे यांनी सविस्तर केले. तसेच कोरोना लसीकरणाबद्दलच्या गैरसमजुतीदेखील दूर केल्या.
श्वसन संस्थेच्या इतर आजारावरती होमिओपॅथीची अद्ययावत उपचार पद्धती व श्वासोच्छ्वासाच्या विविध व्यायाम पद्धतीचे सविस्तर माहिती मुंबईचे डॉ. राहुल जोशी यांनी दिली. गुंतागुंतीशिवाय कोरोना बरा होण्यासाठी ‘फेरम फॉस’ या होमिओपॅथी औषधांची उपयुक्तता कोल्हापूरच्या डॉ. संतोष लांडे यांनी विषद केली.
‘नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी’ची रचना कायदा व उद्दिष्टे यासह त्याचा होमिओपॅथी औषधप्रणालीच्या विकासावर होणारे परिणाम गडहिंग्लज येथील प्राचार्य डॉ. रोझारिओ डिसोजा यांनी विषद केले. दिवसभर चाललेल्या परिषदेत मुंबईच्या डॉ. मनिषा शर्मा, डॉ. पायल परमार यांचीही व्याख्याने झाली.
प्रारंभी होमेसा प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून असोसिएशनमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. संयोजक सचिव डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी ‘कोरोना – काहीही कायमचे टिकत नाही’ या परिषदेच्या संकल्पनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सचिव डॉ. राजेश कागले यांनी आभार मानले.
परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. हिम्मतसिंह पाटील, डॉ. सुहास पाटील, डॉ. अन्वर गंजेली, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. शितल पाटील, डॉ. सुधीर जरे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. परिषदेस सुमारे तीन हजार होमिओपॅथस ऑनलाइन उपस्थित होते.
———————————————– 2 Attachments