योग्यवेळी मी थांबत आहे: अरूण नरके

Attachments


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
    माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके यांनी गोकुळ दूध संघाच्या  निवडणूकीमधून माघार घेतली आहे. ते निवृत्त होत असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. सुरवात तर सगळेच करतात पण कुठे थांबायचे हे ज्याला कळते.तोच जीवनात यशस्वी होतो. आणि योग्यवेळी मी थांबत आहे, असे भावूक उद्गार गोकुळ दूध संघाचे जेष्ठ संचालक अरुण नरके यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.
      गोकुळच्या प्रोटोकॉलप्रमाणे निवडणुकीमुळे संघाची आज शेवटची बोर्ड मिटिंग. कार्यकाल यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व संचालकांचा सत्कार, परंतु यामध्ये ज्यांनी चुयेकरसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून ४६ वर्षे काम केले. त्यांची आज खऱ्या अर्थाने शेवटची मिटिंग. जेष्ठ संचालक अरूण नरके यांनी गोकुळ दूध संघाच्या  निवडणूकीमधून माघार घेतल्याने ते निवृत्त होत आहेत त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
    आसपासच्या जिल्ह्यात किंवा राज्यात सहकाराची अवस्था बिकट असताना गोकुळ मात्र दीपस्तंभाप्रमाणे उभा आहे. डॉ. वर्गिस कुरीयन यांच्या स्वप्नातला दुग्ध व्यवसाय गोकुळने साकारला असून त्याचे खरे श्रेय हे सर्व संचालक, दूध उत्पादक, संघ कर्मचारी व सहकारचे हितचिंतक यांना जाते असे उद्गार कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी यावेळी काढले.
      यावेळी बोलताना जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांना अश्रू अनावर झाले. ज्यांच्या सोबत ४३ वर्षे काम केले ते इथून पुढे मार्गदर्शक म्हणून काम करतील तसेच चेतन नरके यांच्या रूपाने नवीन आश्वासक वारसा नरकेसाहेबांनी दिला आहे. आनंदराव पाटील चुयेकर यांनी लावलेल्या या रोपट्याचे डेरेदार वृक्षामध्ये रूपांतर हे नरकेसाहेबांच्या कुशाग्र बुद्धी व दूरदृष्टीतून साकारल्याचे गौरव उद्गार जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांनी काढले.
      संघाचे चेअरमन रविंद्र आपटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, संघाचे कामकाज हे राजकारण विरहीत राहिले असून आजपर्यंत १४ राष्ट्रीय पुरस्कार तसेच विविध क्षेत्रामधील उच्च व्यक्तींनी गोकुळबद्दल गौरवोउद्गार काढले आहेत. जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळबद्दल काही राजकीय व्यक्ती वक्रदृष्टी ठेवून असून त्यांच्यापासून गोकुळला वाचवायचे असेल तर सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीमध्‍ये एकत्र येवून गोकुळचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चेअरमन रविंद्र आपटे यांनी केले.
      संघ सेवेतून निवृत्‍त झाल्याबद्दल असि.ऑफीसर विजय दरेकर, ऑपरेटर सदाशिव पाटील, कामगार विलास चौगुले व क्‍लार्क रंगराव बोडके यांचाही सत्‍कार करण्यात आला.
      यावेळी संचालक विश्‍वास जाधव, बाळासाहेब खाडे, दिपक पाटील, सत्‍यजित पाटील, बाबा देसाई, विलास कांबळे, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणकेर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, डेअरी मॅनेजर चौधरी, जनसंपर्क अधिकारी पी.आर.पाटील व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *