बहिरेवाडी ग्रामस्थांचे पांग फेडण्याचे भाग्य मला मिळाले: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Spread the love

• पिण्याच्या पाण्यासाठी पाच कोटीच्या योजनेचा पायाखुदाई
कोल्हापूर • प्रतिनिधी
      बहिरेवाडी (ता.आजरा) या गावाला पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष. पिण्याच्या पाण्यासाठी येथील माता-भगिनींची चाललेली वणवण मला अस्वस्थ करायची. या गावानेही माझी नेहमीच हिमालयासारखी पाठराखण केली आहे. या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी महत्वकांशी योजना मंजूर करून ग्रामस्थांच्या ऋणाचे पांग फेडण्याचे भाग्य मला मिळाले, अशी कृतज्ञता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
       बहिरेवाडी गावाला मंजूर झालेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेचा पायाखुदाई समारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. जलजीवन अंतर्गत हिरण्यकेशी नदीतून उपसा करून गावाला पाणी पुरवठा करायच्या या योजनेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
       मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, भौगोलिक रचना व डोंगर माथ्यावर वसल्यामुळे हे गाव पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी वंचितच राहिले. जमिनीतील पाणी साठ्यामुळे बोरवेलनाही पाणी लागायचे नाही. त्यावर इलाज म्हणून हिरण्यकेशीच्या पाण्याचा पर्याय शोधला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे. आता शेतीच्या पाण्यासाठी आंबेहोळ प्रकल्पातून पाणी आणण्याची गरज आहे. या प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या माध्यमातून या गावासाठी उपसा जलसिंचन योजना तयार करु, असेही ते म्हणाले.
       माजी जि. प. सदस्य वसंतराव धुरे म्हणाले, कागल तालुक्याच्या बरोबरीनेच मंत्री मुश्रीफ यांनी उत्तुर विभागातील गावांनाही समान न्याय दिला आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे बहिरेवाडी ग्रामस्थांचे पाण्यावाचून होणारे जन्मोजन्मीचे हाल थांबणार आहेत. माजी उपसरपंच सुरेश खोत यांनी मनोगत व्यक्त केले.
       व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, शिरीष देसाई, मारुती घोरपडे, महादेव पाटील, विजय वांगणेकर, उदय पोवार, गोविंद सावंत आदी उपस्थित होते.
      स्वागत जम्बोअण्णा गोरूले यांनी केले. प्रास्ताविक सरपंच अनिल चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!