वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस् ॲपद्वारे माहिती द्या: महावितरणचे आवाहन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉटस् ॲपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
      दरम्यान, महावितरणच्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेमधील रोहित्र, फिडर पिलर, वीजखांब आदींवर कोणत्याही प्रकारचे पोस्टर्स, पत्रके चिटकवू नयेत. वीज यंत्रणेवर पोस्टर्स किंवा पत्रके चिटकवताना विद्युत अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून कोणत्याही प्रकारचे पत्रके किंवा पोस्टर्स वीजयंत्रणेवर लावू नयेत किंवा चिटकवू नयेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
      कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७८७५७६९१०३ हा व्हॉटस् ॲप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. या क्रमांकावर नागरिकांना कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस् ॲपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस् ॲप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील सध्या सुरु असलेली ही सेवा उपलब्ध आहे.
      व्हॉटस् ॲपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉटस् ॲपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.)  अंकुश नाळे यांनी केले आहे.
————————————

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!