मिरवणूक न काढता साध्या पध्दतीने गणेश मुर्तींचे विसर्जन करावे: शैलेश बलकवडे

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
     कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिक, सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनंत चतुर्दशी (१९ सप्टेंबर २०२१) दिवशी गणेश मुर्ती विसर्जनाकरीता लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना गणेश मुर्ती विसजर्नाकरीता शक्यतो सोबत घेवून जावू नये. तसेच मिरवणूक न काढता शासन निर्देशाप्रमाणे साध्या पध्दतीने गणेश मुर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन  जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
      गणेश मुर्ती विसर्जना दिवशी गणेशमुर्ती नेताना होणारी गर्दी टाळण्याकरीता गणेश मंडळांचे पदाधिकारी यांनी ८ ते १० मर्यादीत कार्यकर्त्यांना घेवून गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी जावे. यावेळी विनाकारण गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. गणेश मुर्तींच्या विसर्जन मिरवणूकीसाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांचे तंतोतंत पालन करावे. तसेच विसर्जन मिरवणूक काढू नये. त्या त्या भागातील सार्वजनिक गणेश मंडळांनी अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन करण्याकरीता खालील मार्गांचा वापर करावा. जेणेकरुन गर्दी टाळता येवून व्यवस्थित विसर्जन करता येईल.
  १) संभाजीनगर, न्यू महाव्दार रोड, शाहू बँक, मंगळवार पेठ या परीसरातील गणेश मुर्ती या नंगीवली चौक, ८ नं.शाळा मार्गे इराणी खणीकडे जाणा-या मार्गाचा वापर करावा.
  २) राजारामपूरी, जवाहरनगर, सुभाषनगर या गणेश मंडळांनी सायबर चौक, आयसोलेशन हॉस्पीटल, संभाजीनगर स्टॅन्ड मार्गे इराणी खणीकडे मार्गस्थ व्हावे.
  ३) उद्यमनगर, बागल चौक, शाहूमिल, राजारामपूरी, टाकाळा परीसर येथील गणेश मंडळांनी गोखले कॉलेज, हॉकी स्टेडीयम, संभाजीनगर मार्गे इराणी खणीकडे मार्गस्थ व्हावे.
  ४) शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, रविवार पेठ येथील गणेश मंडळांनी त्यांच्या स्थापना ठिकाणाहून गंगावेश, रंकाळा टॉवर  मार्गे इराणी खणीकडे मार्गस्थ व्हावे.
  ५) लक्ष्मीपूरी, शाहुपूरी परिसरातील गणेश मंडळांनी बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पापाची तिकटी, गंगावेश मार्गे इराणी खणीकडे मार्गस्थ व्हावे.
     महापूर, कोरोनाचे संकट या कठीण प्रसंगांना संपूर्ण करवीरवासियांनी शासनाच्या निर्बंधांचे पालन करुन चांगले उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. तसेच गणेशोत्सवादरम्यान कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करून उत्सव साजरा केल्या बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. गणेश मुर्ती आगमनादिवशी सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करून कोणतीही मिरवणूक न काढता वेळेत गणपती प्रतिष्ठापना केली. दि.१४ सप्टेंबर २०२१ रोजी घरगुती व सार्वजनिक गणेश मुर्तींच्या विसर्जन कालावधीत इराणी खण कोल्हापूर येथे कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील अंदाजे ५० ते ६० हजार घरगुती गणेश मुर्ती व १२३ सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन कोणत्याही मंडळाने तसेच घरगुती गणपतीची मिरवणूक न काढता सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून गौरी गणपतीचे विसर्जन केले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!