नव्या वर्षात ३ अंगारकीसह १३ संकष्टी चतुर्थी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     यंदाच्या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी अर्थात संकष्टी गुरूवारी (दि.३) झाली. वर्षभरात एकूण बारा संकष्टी झाल्या, त्यामध्ये एकही अंगारकी संकष्टी चतुर्थी  नव्हती. परंतु येणाऱ्या  नव्या वर्षात ३ अंगारकी संकष्टी चतुर्थीसह एकूण १३ संकष्टी चतुर्थी आल्या आहेत.
     साधारणपणे महिन्यात एक याप्रमाणे वर्षात १२ संकष्टी असतात. परंतु येणारे नवीन वर्ष २०२१ मध्ये एकूण १३ संकष्टी चतुर्थी आल्या आहेत. जानेवारी आणि मार्च महिन्यात प्रत्येकी दोन संकष्टी आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात संकष्टी नाही. सन २०२० मध्ये एकही अंगारकी संकष्टी चतुर्थी नव्हती. मात्र नव्या वर्षात तब्बल तीन अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग गणेशभक्तांना आला आहे.
    दरम्यान, माघी श्री गणेश जयंती सोमवार दि. १५ फेब्रुवारीला आहे. अबालवृद्धांच्या लाडक्या गणपतीबाप्पांचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला होते. शुक्रवार दि.१० सप्टेंवर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. 
     शुभकार्यारंभी प्रथम पूजेचा मान श्री गणेशाला आहे. श्री गणेशाची मोठ्या भक्तिभावाने पूजाअर्चा केली जाते. अनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात. काहीजण विनायक चतुर्थीसुध्दा करतात. मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी म्हणतात. त्याचे विशेष महत्त्व असल्याने अंगारकी संकष्टीचा उपवास करणारे असंख्य गणेशभक्त आहेत. अशा भक्तांना नव्या वर्षात तीन अंगारकी संकष्टी चतुर्थीचे योग आले आहेत. एकंदरीत संकष्टी चतुर्थीचा उपवास करणाऱ्यांना नव्या वर्षात ३ अंगारकीसह एकूण १३ संकष्टी चतुर्थीचे योग आहेत.
     नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात दोन संकष्टी आहेत. शनिवार दि.२ आणि रविवार दि.३१ यादिवशी संकष्टी चतुर्थी आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात संकष्टी नाही. परंतु मार्च महिन्यात पुन्हा दोन संकष्टी आल्या आहेत. दि.२ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी व दि. ३१ रोजी संकष्टी चतुर्थी आहे. त्यानंतरच्या प्रत्येक महिन्याला मात्र एक याप्रमाणे संकष्टी चतुर्थी आहे. अशाप्रकारे नव्या वर्षात एकूण १३ संकष्टी चतुर्थीचा उपवास करण्याचा योग गणेशभक्तांना आला आहे.
       संकष्टी चतुर्थी व चंद्रोदय वेळ (श्री महालक्ष्मी कॅलेंडरमधील नोंदीनुसार)
दि.२ जानेवारी – चंद्रोदय रात्री ९:१३ वाजता,
दि.३१ जानेवारी – चंद्रोदय ९:०० वाजता,
दि.२ मार्च – ९:४४ (अंगारकी संकष्टी) ,   दि.३१ मार्च – ९:३२ वाजता,
दि.३० एप्रिल – १०:३० वाजता,
दि.२९ मे – १०:१७ वाजता,
दि.२७ जून – ९:५१ वाजता,
दि.२७ जुलै – ९:५२ (अंगारकी संकष्टी), दि.२५ ऑगस्ट – ९:०१ वाजता,
दि.२४ सप्टेंबर – ८:४५ वाजता,
दि.२४ ऑक्टोबर – ८:४४ वाजता,
दि.२३ नोव्हेंबर – ९:०५ (अंगारकी संकष्टी),
दि.२२ डिसेंबर – ८:४७ वाजता. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!