फोटोकॅटॅलिसीस व सौरघट संशोधनात डॉ. पी. एस. पाटील देशात दुसरे

Spread the love


• जागतिक ‘टॉप-१५०’ संशोधकांत समावेश
कोल्हापूर • प्रतिनिधी
     फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट संशोधनाच्या क्षेत्रात येथील शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक तथा प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील हे जागतिक संशोधकांच्या यादीत ‘टॉप-१५०’मध्ये तर देशात दुसऱ्या स्थानी झळकले आहेत. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील त्यांचे संशोधनपर लेखन देशात सर्वाधिक वाचले गेले आहे. त्यांच्या संशोधनाला ३७०८ इतक्या व्ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा- २०१६-२०२१’मधून त्यांचे हे स्थान अधोरेखित झाले आहे.
     डॉ. पी. एस. पाटील यांची मटेरिअल सायन्स, नॅनोसायन्स, फोटोकॅटॅलिसिस, सोलर सेल डेव्हलपमेंट आदी क्षेत्रांतील संशोधनासाठी जगभरातील आघाडीच्या संशोधकांमध्ये गणना केली जाते. काही काळापूर्वीच जाहीर झालेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या २ टक्के संशोधकांमध्येही त्यांचे नाव आघाडीवर होतेच. त्याचप्रमाणे ‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग’मध्येही डॉ. पाटील यांचे नाव अग्रस्थानी होते. नुकताच सन २०१६ ते २०२१ या कालावधीतील ‘स्कोपस’ डाटाच्या आधारे केवळ फोटोकॅटॅलिसिस व सोलर सेल क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील आघाडीच्या ५०० संशोधकांचा समावेश असणारा ‘एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा’ जाहीर करण्यात आला. या यादीमध्ये डॉ. पी.एस. पाटील हे १४७व्या स्थानी आहेत. त्यांच्यावर १३१व्या स्थानी ओडिशा येथील आय.टी.ई.आर. शिक्षा ‘ओ’ अनुसंधान या संस्थेचे डॉ. के.एम. परिदा हे आहेत. भारतीय संशोधकांच्या यादीत डॉ. पारिदा हे प्रथम स्थानी तर डॉ. पाटील हे द्वितीय स्थानी आहेत.
     भारतीय संशोधकांच्या ‘टॉप-५००’च्या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठातील अन्य सात संशोधकांनाही स्थान प्राप्त झाले आहे. यामध्ये डॉ. व्ही. एल. पाटील, डॉ. एस. डी. डेळेकर, डॉ. के. एम. गरडकर, डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. ए. जी. दोड्डमणी, डॉ. ए. व्ही. मोहोळकर आणि डॉ. एन. एल. तरवाळ यांचा समावेश आहे.
     सदर यादी सन २०१६ ते २०२१ या कालावधीतील ‘स्कोपस’ डाटाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या विज्ञानपत्रिकांमधून प्रसिद्ध झालेल्या संशोधनाचा आधार घेण्यात आला असून स्कॉलरली आऊटपुट, व्ह्यूज काऊंट, फिल्ड-वेटेड सायटेशन इम्पॅक्ट आणि सायटेशन काऊंट आदींच्या आधारे क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. पी. एस. पाटील यांचा स्कॉलरली आऊटपुट ८३ असून त्यांच्या संशोधनाला देशात सर्वाधिक ३७०८ व्ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. त्यांचा फिल्ड-वेटेड सायटेशन इम्पॅक्ट १.९१ इतका असून सायटेशन काऊंट १७२६ इतका आहे.
——————————————————- ReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!