येत्या चार वर्षात कोल्हापूर सर्वच क्षेत्रात आघाडीचे केंद्र बनेल: पालकमंत्री

Spread the love

• “व्हायब्रंट महाएक्स्पो” प्रदर्शनाच्या माहिती पत्रिकेचे अनावरण
कोल्हापूर • प्रतिनिधी 
      कोल्हापूर विमानतळ, करवीर एमआयडीसी, डेस्टिनेशन कोल्हापूर, राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण यासारख्या नव्या  प्रकल्पांवर प्रशासकीय यंत्रणा वेगात काम करत असून येत्या चार वर्षात कोल्हापूर  हे पुण्या मुंबईबरोबरच व्यापार उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
     महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२ या प्रदर्शनाचे १५ ते १८ एप्रिल या कालावधीत शाहूपुरी जिमखाना मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाचे अनावरणप्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. येथील रेसिडेन्सी क्लब येथे हा कार्यक्रम झाला.
     याप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंम्बर ऑफ कॉमर्सचे  अध्यक्ष संजय शेटे, जनसुराज्य शक्ती युवाचे अध्यक्ष समित कदम, कोल्हापूर इंजिनियरीग असोसिएशन सचिन मेनन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल आणि हातकणंगलेचे अध्यक्ष संजय पेंडसे, गोशिमाचे अध्यक्ष मोहन पंडितराव, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागलचे प्रेसिडेंट दिपक पाटील, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमॅन असोसिएशनचे प्रेसिडेंट रवींद्र पाटील, क्रीडाई कोल्हापूरचे प्रेसिडेंट विद्यानंद बेडेकर, वेस्टर्न महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलचे संचालक सत्यजित भोसले, आनंद माने, प्रदीपभाई कपाडिया आदी उपस्थित होते.
       याप्रसंगी पालकमंत्री पाटील म्हणाले की, कोल्हापूर हे आता विकसित होत असून पुण्या मुंबई पाठोपाठ लोक आता कोल्हापूरला प्राधान्य देत आहेत. कोल्हापूरला चालना देण्यासाठी आपण सर्वच घटकांनी व उद्योजकांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. कोल्हापूरमधून सध्या तीन विमाने उड्डाण करतात. नाईट लँडिंगची तयारी केली जात आहे. कोल्हापूर मुंबई उडान योजनेअंतर्गत कोल्हापूर – मुंबई विमानसेवा लवकरच सुरळीत होईल. विस्तारीकरणासाठी अजून ६४ एकर जागा आवश्यक आहे. १००० च्या आसपास मालक आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना इतर पर्यायी जागा देऊन जागेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोल्हापूरात नवनवीन प्रोजेक्ट आणले जात आहेत, यामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे. पर्यटक येण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न चालू आहेत. कला व सांस्कृतिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात शिवाय इन्फ्रास्ट्रक्चर व भौगोलिकदृष्ट्याही सुविधा देऊन कोल्हापूरला पुढे नेणे आवश्यक आहे. यासाठी नव्या पिढीला सहभागी करून मार्केटिंग करणे गरजेचे आहे, असे ना. पाटील यांनी सांगितले. व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२ प्रदर्शन हे उद्योजकांना नवी चालना व वेगवेगळे उद्योग उभे करण्यासाठी प्रेरणा देणारे असेल असे सांगितले.
      ललित गांधी यांनी बोलताना औद्योगिक उत्पादनाचे हे प्रदर्शन असून उद्योजकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून एक चांगली संधी मिळेल. देशभरातील नामवंत कंपन्यांचे स्टॉलचा समावेश या प्रदर्शनामध्ये असून दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालावधीनंतर हे विकासाला चालना देणारे नव्या पद्धतीचे प्रदर्शन भरविले गेले असून प्रदर्शनाच्या निमित्ताने माहिती तंत्रज्ञान याची माहिती होणार आहे. रोबोटीक टेक्नॉलॉजीचा यामध्ये समावेश आहे. याचा उपयोग उदयोग क्षेत्रात नव्या पिढीला करता येणार आहे. नवीन डिफेन्स सेक्टरलाही याचा फायदा होणार आहे. डेस्टिनेशन कोल्हापूर ही संकल्पना यातून मांडली जाणार आहे, यामुळे कोल्हापूरचे नाव प्रदर्शनाच्या माध्यमातून एक नवीन ब्रँड म्हणून पोहोचणार आहे.
      यावेळी संजय शेटे, संजय पेंडसे, रविंद्र चिरपुटकर, विद्यानंद बेडेकर, सत्यजित भोसले, समीत कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ताज मुल्लाणी यांनी केले तर आभार हरिषभाई पटेल यांनी मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!